जळगावात दररोज 100 जणांना अन्नदान
By admin | Published: May 18, 2017 01:32 PM2017-05-18T13:32:38+5:302017-05-18T13:32:38+5:30
शहरातील काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरासमोर दररोज सकाळी 11 वाजता गरजू भरपेट जेवण
विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 18 - कुणीही उपाशी राहू नये, त्यांना किमान एक वेळचे तरी जेवण मिळावे, या उद्देशाने जैन श्वेतांबर मूर्तीपूजक खरतर गच्छ संघातर्फे दररोज 100 जणांना अन्नदान केले जात आहे. शहरातील काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरासमोर दररोज सकाळी 11 वाजता गरजू भरपेट जेवण करून तृप्ततेचा ढेकर देत अन्नदात्यांना आशीर्वाद देत असल्याची अनुभूती दररोज येत आहे.
भूक शमली जाऊन पोट भरलेले असेल तर मनात चांगले भाव येतात या साध्वी श्री विश्वज्योतीजी. म.सा. यांच्या शिकविणीची प्रेरणा घेऊन जैन श्वेतांबर मूर्तीपूजक खरतर गच्छ संघाने 1 मे, या महाराष्ट्र दिनापासून दररोज किमान 100 लोकांना तरी अन्नदान करण्याचा निर्णय घेत हा उपक्रम सुरू केला आहे.
दररोज सकाळी पोटभर जेवण
श्री वासुपूज्य जैन मंदिरासमोर 1 मे पासून गरजूंच्या पोटाला आधार मिळू लागला असून त्यांच्यासाठी संघातर्फे दररोज जेवणाचे पाकीट तयार ठेवले जातात. यामध्ये भाजी, सहा पोळ्य़ा, वरण-भात यात कधी पुलाव, खिचडी दिली जाते. विशेष म्हणजे सणाच्या दिवशी मिठाईदेखील दिली जाते.
तृप्ततेचा ढेकर
दररोज ठिकठिकाणी अन्नासाठी भटकंती करूनही पोटात अन्नाचा एक कण जात नसताना आता दररोज पोटभर जेवण मिळू लागल्याने दररोज 100 जण तृप्ततेचा ढेकर देत आहे.
इतर ठिकाणचीही पाहणी सुरू
रेल्वे स्थानक, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, इतर मंदिर अथवा ज्या ठिकाणी 100 जण येऊ शकतील अशा ठिकाणची सध्या संघाच्यावतीने पाहणी सुरू असून या ठिकाणी हे अन्नदान करण्याचा संघाचा मानस आहे. या पाहणी नंतर प्रत्येक ठिकाणी कधी जेवण द्यायचे याचा दिवस ठरविला जाणार आहे.
हा उपक्रम प्रथम गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात येणार होता, मात्र संपूर्ण नियोजन झालेले नव्हते. त्यानंतर अक्षयतृतीयेपासून त्याची सुरुवात होणार होती, मात्र महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित करून त्या दिवसापासून अन्नदानास सुरुवात करण्यात आली.
वर्षभर चालणार उपक्रम
अन्नदानाचे हे कार्य एक वर्ष सुरू राहणार असून दररोज 100 जणांना जेवण दिले जाणार असल्याचे संघाच्यावतीने सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी संघाचे अध्यक्ष सुमतीलाल टाटिया, सदस्य जितेंद्र छाजेड, विजय जैन, विनोद बेडर, संजय गांधी, सुरेंद्र टाटिया, किरण निमजिया, कल्पेश दोशी, विनय टाटिया हे परिश्रम घेत आहेत.
दररोज कितीतरी जण भुकेले असतात. प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे, कोणीही भूकेले राहू नये, यासाठी संघाच्यावतीने दररोज 100 जणांना जेवण दिले जात आहे. वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार आहे.
- संजय गांधी, सदस्य, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक खरतर गच्छ संघ.