घोषणेमुळे वाटला आधार, पुरेशा इष्टांकाअभावी गरजू निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:02+5:302021-04-18T04:15:02+5:30
रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमध्ये हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा ...
रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमध्ये हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा झाली खरी, मात्र घेणारे अधिक, इष्टांक कमी यामुळे अनेकांना रिकाम्या हातीच माघारी परतावे लागत आहे. भुकेल्या पोटी केंद्रावर येऊन हाती काहीच न लागल्याने अनेकांची निराशा होत आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग उद्भवला व अनेक व्यवहार बंद झाले. त्यावेळी शिवभोजन केंद्रावरून पाच रुपये थाळी याप्रमाणे आधार दिला गेला. यावर्षी पुन्हा कोरोना झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ लागू करत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत रोजंदारी करणाऱ्या व हाताला काम नसलेल्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोफत शिवभ़ोजन देऊन आधार देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला. या संदर्भात शहरातील शिवभोजन केंद्रांची स्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहिली असता, अनेक ठिकाणी घेणारे जास्त व थाळींचे प्रमाण कमी असेच चित्र पाहायला मिळाले.
‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शिवभोजन केंद्रांवरील इष्टांक तत्काळ संपल्याने जेवढ्या थाळ्या मंजूर असतील जवळपास तेवढ्याच व्यक्ती माघारी गेल्या.
केंद्र बंद
कैलास कोल्ड्रिंक्स याठिकाणी असलेल्या शिव भोजन केंद्रासाठी ७५ थाळींचे इष्टांक आहे. याठिकाणी पाहणी केली असता, ११ वाजता शिवभोजन थाळीचे वाटप सुरू झाल्यानंतर साधारण बारा वाजेपर्यंत सर्व थाळी संपल्या होत्या. यावेळी पाहणी दरम्यान या केंद्राचा दरवाजा लावलेला होता. याठिकाणी असलेल्या व्यक्तींना विचारले असता, त्यांनी थाळी संपल्याचे सांगितले.
तासाभरात पूर्ण
मनोहर रेस्टारंट या शिवभोजन केंद्राच्या ठिकाणीही ७५ थाळी मंजूर आहेत. याठिकाणी पाहणी केली असता, वाटप सुरू झाल्यानंतर एक तासात संपूर्ण थाळींचे वाटप झाले होते. त्यानंतर आलेल्यांना माघारी परतावे लागले.
पोलीस विचारत असताना केंद्रावर मात्र हाती काहीच नाही
श्री व्यंकटेश झुणका-भाकर केंद्र याठिकाणी अनेकजण शिवभोजन थाळी घेण्यासाठी आले होते. मात्र, जेवढ्या थाळी आहेत, तेवढ्यांचे वाटप झाल्यानंतर अनेकांना रिकाम्या हातीच परतावे लागले. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून विचारणा होते, त्यांना उत्तर देत-देत अनेकजण केंद्रावर पोहोचले होते. मात्र, इष्टांक पूर्ण झाल्याने अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले.
जेवढ्या थाळ्या मंजूर आहेत तेवढ्याच ही केंद्र वाटप करू शकतात. सध्या हाताला काम नसल्याने अनेकजण पोटाची खळगी भरण्यासाठी शिवभोजन केंद्राचा आधार घेऊ इच्छितात. त्यामुळे अनेकजण ही थाळी घेण्यासाठी आले तरी त्यांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागत असल्याचे चित्र आहे.
शहरातील केंद्र १६
मंजूर थाळ्या १,२५०
जिल्ह्यातील केंद्र ३८
मंजूर थाळ्या ३,५००
वाढीव थाळ्यांचे नियोजन
अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते शिवभोजन केंद्राचा आधार घेत आहेत. मात्र, याठिकाणी मंजूर इष्टांक कमी पडत असल्याने थाळ्या वाढवून देण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार आता प्रत्येक केंद्राच्या मंजुरी इष्टांकापैकी दीडपट इष्टांक मंजूर करण्यात आला आहे.