संत मुक्ताबाई संस्थानचा वार्षिक कीर्तन महोत्सव कोरोनामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:33 PM2021-01-13T14:33:47+5:302021-01-13T14:34:11+5:30
संत मुक्ताबाई संस्थानचा वार्षिक कीर्तन महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.
ref='https://www.lokmat.com/topics/muktainagar/'>मुक्ताईनगर : वारकरी संप्रदायातील भाविकांकरिता विशेष पर्वणी ठरणारा संत मुक्ताबाई संस्थान कोथळी - मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील १७ ते २४ फेब्रुवारी दरम्यान साजरा होणारा देगलुरकर फडाचा कीर्तन सप्ताह महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.श्रीसंत मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर समाधीस्थळावर दरवर्षी वारकरी संप्रदायातील प्रख्यात जेष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, फडकरी यांच्या सहभागातून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन संत मुक्ताबाई संस्थान करीत असते. या महोत्सवात राज्यातील हजारो भाविक उपस्थित असतात ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, भजनास नामवंत गुणीजन सेवा देतात. यावर्षी १७ ते २४ फेब्रुवारीपर्यंत देगलुरकर फडाच्या सहभागातून चैतन्य महाराज देगलुरकर यांचे ताटीचे अभंग निरूपण, ज्ञानेश्वरी पारायण व जयवंत महाराज बोधले, प्रमोद अण्णा जगताप, माधवदास महाराज राठी, चंद्रशेखर महाराज देगलुरकर, महादेव महाराज राऊत आदींची कीर्तने आयोजित केली होती. आठ दिवस भाविकांना भरगच्च आध्यात्मिक मेजवानीच ठरणारी होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे, विनायकराव पाटील, उध्दव महाराज जुनारे, विलास संत यांनी पंढरपूर येथे चैतन्य महाराज देगलुरकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. यावर्षीचा कार्यक्रम रद्द करून पुढील वर्षांत २०२२ मध्ये सप्ताह महोत्सव करण्याचे ठरले आहे. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातच हा भव्यदिव्य कार्यक्रम साजरा होणार असल्याने भाविकांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.