पालकमंत्री महाजन यांच्या कार्यालयाजवळ बॉम्ब असल्याच्या निनावी फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 08:51 PM2019-06-17T20:51:04+5:302019-06-17T20:55:12+5:30
जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी एका टपरीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन जिल्हा पेठ पोलिसांना आल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथक अत्याधुनिक यंत्रासह काही मिनिटातच दाखल झाले. अर्धा तास शोध घेतल्यानंतर हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जळगाव : जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी एका टपरीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन जिल्हा पेठ पोलिसांना आल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथक अत्याधुनिक यंत्रासह काही मिनिटातच दाखल झाले. अर्धा तास शोध घेतल्यानंतर हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवतीर्थ मैदानाच्या समोर असलेल्या जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या शेजारी एका जुन्या टपरीत बॉम्ब असल्याचा फोन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आला. ठाणे अमलदाराने ही माहिती तातडीने प्रभारी अधिकारी संदीप आराक यांना कळविली. आराक यांनी बॉम्ब शोध व नाशक पथक व वरिष्ठांना कळवून तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम हे देखील आपल्या सहकाºयांसह महाजन यांच्या कार्यालयाजवळ पोहचले. श्वान तसेच बॉम्ब शोध पथकाच्या कर्मचाºयांनी मेटल डिटेक्टरद्वारे बॉम्ब व बॉम्ब सदृष्य वस्तूचा शोध घेतला. ज्या टपरीची माहिती मिळाली, त्या टपरीचे कुलुप तोडून तपासणी करण्यात आली. शेजारील गल्लयांमध्येही यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली, मात्र कुठेच काही मिळाले नाही.
नवी मुंबई आणि जळगावात निनावी फोन
जळगावप्रमाणेच नवी मुंबईतील कळंबोली येथे सुधागड महाविद्यालयाच्या शेजारी बॉम्ब असल्याचा निनावी फोन सोमवारी दुपारी नवी मुंबई पोलिसांना आला होता. तेथेही यंत्रणेची धावपळ उडाली. दरम्यान, जळगावात मंत्री महाजन यांच्या कार्यालयाशेजारील गल्लीत प्रेमीयुगुलांचे चाळे चालत असल्याने रहिवाशी कंटाळले आहेत, पोलिसांकडे तक्रार करुनही उपयोग होत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन दामिनी पथकही निष्क्रीय झाले आहे. त्यामुळे त्यातून तर हा प्रकार कोणी केला नाही ना? याची चौकशी पोलीस करीत आहेत.