चोरट्याकडून आणखी १७ सायकली हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:24+5:302021-06-05T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वेगवेगळ्या भागांतून सायकली चोरून त्या कमी भावात विक्री करणाऱ्या गणेश दौलत साबळे (रा. खडका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वेगवेगळ्या भागांतून सायकली चोरून त्या कमी भावात विक्री करणाऱ्या गणेश दौलत साबळे (रा. खडका रोड, भुसावळ) याच्याकडून आणखी १७ सायकली वेगवेगळ्या गावांमधून हस्तगत करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत त्याने पोलिसांना एकूण ३५ चोरीच्या सायकली काढून दिल्या.
शहरात दुचाकी व सायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे आणि राजकुमार चव्हाण हे बुधवारी २ जून सकाळी ८ वाजता पेट्रोलिंग करीत होते. नेहरू चौकाजवळील कपड्याच्या दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आढळून आली. त्याची चौकशी केली असता, त्याने गणेश साबळे असे नाव सांगितले. कसून चौकशी केल्यानंतर तो सायकल चोर असल्याचे समोर आले व त्याच्याकडून तब्बल १८ चोरीच्या सायकली हस्तगत करण्यात आल्या. नंतर त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुऱ्हा, गोजोरा येथून सायकली ताब्यात
दरम्यान, गेल्या एक वर्षापासून सायकली चोरी करीत असल्याची माहिती तपासात समोर आल्यामुळे पोलिसांनी तपासाला वेग दिला. विजय निकुंभ, तेजस मराठे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण यांनी चोरट्याला सोबत घेत चोरी केलेल्या दुचाकी हस्तगत करण्याची मोहीम हाती घेतली. कुऱ्हा, गोजोरा तसेच कुऱ्हा तांडा आदी भागातून तब्बल १७ सायकली चोरट्याने पोलिसांना काढून दिल्या. विशेष म्हणजे, या गावांमध्ये ती कमी किमतीत सायकली विकणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाली होती. आतापर्यंत एकूण ३५ चोरीच्या सायकली त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच साबळे याला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी वाढविली आहे.