भुसावळातील हत्याकांडामागे दुसरी व्यक्ती ? ; आणखी आरोपी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:10 PM2019-10-10T12:10:01+5:302019-10-10T12:10:28+5:30

आरोपींनी सांगितलेली माहिती आणि तपासात आढळलेल्या काही बाबी यांच्यातील तफावत

Another person behind the massacre? ; More accused will rise | भुसावळातील हत्याकांडामागे दुसरी व्यक्ती ? ; आणखी आरोपी वाढणार

भुसावळातील हत्याकांडामागे दुसरी व्यक्ती ? ; आणखी आरोपी वाढणार

Next

जळगाव : भुसावळ शहरातील पाच जणांच्या हत्याकांडात दुसरा व्यक्ती कार्यरत असल्याचा संशय असून दोन दिवसाची चौकशी, त्यातून निष्पन्न झालेल्या बाबी व काही तांत्रिक पुरावे पाहता ताळमेळ जुळत नसून अनेक बाबींमध्ये तफावत आढळून येत आहे, त्यामुळे या हत्याकांडाशी संबंधित आणखी काही जण रडारवर आलेले आहेत. आरोपी काही बाबी लपवत असल्याचेही सांगण्यात येत आहेत.
दरम्यान, हम्प्याच्या जखमी मुलानेही यात राजकारणातील बड्या व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयात पोलीस अधीक्षकांना दिली होती. तांत्रिक पुराव्याच्या आधार खरा ठरला तर आरोपींची संख्या आणखी वाढू शकते. त्याशिवाय या घटनेत वेगळी शक्ती असावी अशी चर्चा आता भुसावळात रंगत आहे.
रविवारी रात्री भुसावळातील समता नगरात भाजप नगरसेवक तथा रिपाईचे जिल्हाध्यक्ष रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात (५०) यांच्या कुटुंबावर गोळीबार व प्राणघातक हल्ला केला. यात स्वत:रवींद्र उर्फ हम्प्या, भाऊ सुनील बाबुराव खरात (५५), मुलगा सागर रवींद्र खरात, रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात व त्यांचा शेजारी सुमीत गजरे या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र यांची पत्नी रजनी, मुलगा रितेश (१७) व सूरज ताराचंद सपकाळे (१९) हे तीन जण जखमी झाले आहेत. या हत्येप्रकरणी मोहसीन असगर खान उर्फ राज बॉक्सर (२१, रा.कवाडे नगर, भुसावळ), मयुरेश रमेश सुरवाडे (२०, रा.आंबेडकर नगर,भुसावळ) व शेखर हिरालाल मोघे उर्फ राज बॉक्सर (२१, रा.भुसावळ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघंही सध्या पोलीस कोठडीत आहे.
पोलीस चौकशीत अटकेतील तिघांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन उर्फ राजा बॉक्सर, मयुरेश सुरवाडे व शेखर मोघे उर्फ राज बॉक्सर हे तिघं जण चायनीजच्या हातगाडीवरुन जात असताना सागर रवींद्र खरात, सूरज सपकाळे व सुमीत गजरे असे तिघं जण समोरुन आले असता त्यातील सागर याने तिघांसमोर दुचाकी आडवी लावून तुझ्या भावाला जास्त झाले आहे असे म्हणत राज बॉक्सर याच्याशी वाद घालून स्वत:जवळील गावठी पिस्तुल डोक्याला लावला. त्याचवेळी मागे असलेल्या मोहसीन उर्फ राजा बॉक्सर याने सागर याच्या डोक्याला फाईट मारली व त्यात सागर पिस्तुलसह जमीनीवर कोसळला. यावेळी क्षणाचाही विलंब न करता मोघे याने पिस्तुल उचलून सागरवर गोळी झाडली.
त्याचवेळी चॉपर घेऊन हल्ला करण्यासाठी आलेल्या सुमीत गजरे याच्या डोक्यात गोळी झाडली. हा थरार पाहून सागर सोबत आलेला तिसरा मित्र सूरज सपकाळे घराकडे पळत सुटला. हम्प्याचा भाऊ रोहित उर्फ सोनू याला ही घटना समजताच तो चॉपर घेऊन तिघांकडे धावत आला. तिघांच्या अंगावर दुचाकी आणत असताना त्यालाही मोघे याने गळ्यावर चॉपर मारला, त्यात तो जागेवरच कोसळल्यानंतर मोघे व त्याचे दोन्ही मित्र असे तिघंजण हम्प्या याच्याघराकडे गेले. बाहेर मोबाईल बघत असलेल्या हम्प्या याच्या छातीवर मोघे याने गोळीबार केला.
या स्थितीत तो घरात पळत असताना शेजारुन भाऊ सुनील बाबुराव खरात हा चाकू घेऊन अंगावर आला असता त्यालाही तिघांपैकी एकाने गळ्यावर चॉपर मारुन ठार केले. बाथरुमध्ये पळालेल्या हम्प्या याच्याकडे जात असताना पत्नी रजनी यांनाही डोक्यात शस्त्र मारले तर तिसरा मुलगा रितेश याच्यावर गोळीबार केला, परंतु त्याने गोळी चुकविली व त्याच्या पाठीला चाटून गेली. त्यानंतर हम्प्या याच्या छातीवर चॉपरने सपासप वार केले. ठार झाल्याची खात्री झाल्यानंतर तिघं जण स्मशानभूमीकडे नदीत रवाना झाले.
प्रत्यक्ष चौकशी व घटनास्थळाच्या पाहणीत घटनास्थळावर दोन गावठी पिस्तुल व दोन चाकू आढळून आले, ते पोलिसांनी जप्त केले आहेत. संपूर्ण घटनेत एकच पिस्तुलचा वापर झाला असताना दोन पिस्तुल तेथे आलेच कसे? तसेच चाकूही दोन आढळून आले. त्यामुळे घटनेच किती पिस्तुलचा वापर झाला.
या घटनेच्या आधी व नंतर यातील एक आरोपी एका व्यक्तीच्या संपर्कात होता, ती व्यक्ती कोण? पोलिसांच्या तपासात ही बाब उघड होत आहे. आरोपींनी मात्र तशी कोणतीच माहिती पोलिसांना सांगितलेली नाही.ही व्यक्ती पोलिसांच्या हाती आल्यावर काय खुलासा होतो याकडेच आता लक्ष लागून आहे.
आरोपींच्या म्हणण्यानुसार तिघांवर गोळीबार झालेला आहे, मात्र सीटीस्कॅन केल्यानंतर फक्त सुमीत संजय गजरे याच्याच डोक्यात गोळी असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन करताना त्याच्या डोक्यात गेलेली गोळी हनुवटीतून काढण्यात आली. अन्य एकाच्याही शरीरात गोळी नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Another person behind the massacre? ; More accused will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव