रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील गावांखेरीज १९ गावांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 03:50 PM2019-05-10T15:50:00+5:302019-05-10T15:52:59+5:30
रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली आहे.
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली असून, त्या अतिरिक्त १९ गावांपैकी चक्क ११ ग्रामपंचायतकडून टंचाई आराखडा वा तातडीची टीपीडब्ल्यूएस योजनेकरिता अद्यापही प्रस्ताव सादर झाले नसल्याची शोकांतिका आहे.
रावेर पंचायत समितीच्या प्रभारी कार्यकाळात ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकाऱ्यांची ग्रामीण स्तरावर पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्नाबाबत असलेली उदासीनता व मनमानी कारभार यामुळे अधोरेखित होत असल्याची गंभीर टीका होत आहे.
दरम्यान, ११ गावांकरीता मंजूर झालेल्या १४ योजनांमधील जुनोने व जानोरी येथील योजना पूर्णत्वास आल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी मिळालेल्या अन्य ११ कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सायबूपाड्या, सिंगनूर, गोलवाडे, खिरवड, रमजीपूर, ऐनपूर, भाटखेडा, रोझोदा, तिड्या, अंधारमळी, रसलपूर, भोर, वाघोड, मोरगाव खुर्द, निरूळ व नेहता या अतिरिक्त गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, तामसवाडी येथील ग्राम पंचायतींचा विहीर अधिग्रहण करण्याबाबत प्रस्ताव दाखल झाला आहे. मस्कावद बुद्रूक ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेचा भूजलस्त्रोत हरपल्याने मस्कावद खुर्द येथील कूपनलिकेपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी पाणी टंचाई निर्मूलनासाठी तातडीची पाणीपुरवठा योजनेकरीता आजच प्रस्ताव दाखल केल्याची माहिती सूुत्रांनी दिली. शासनस्तरावरून पाणीटंचाई निर्मुलनासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात असताना मात्र पंचायत समिती प्रशासन गंभीर नसल्याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.