सहा तालुक्यांत एपीएल कार्डधारकांना मिळणार नाही धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:13 AM2021-06-03T04:13:38+5:302021-06-03T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केलेल्या एपीएल कार्डधारकांना धान्य वाटप करण्याच्या योजनेचे शिल्लक धान्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केलेल्या एपीएल कार्डधारकांना धान्य वाटप करण्याच्या योजनेचे शिल्लक धान्य या वर्षी नागरिकांना देण्याचे जाहीर केले. मात्र बोदवड, यावल, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर येथे शासकीय गोदामातच धान्य शिल्लक नाही. त्यामुळे या तालुक्यांतील एपीएल कार्डधारकांना धान्य मिळणार नाही. या तालुक्यांत काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांमध्ये या योजनेतील धान्य शिल्लक आहे. त्यामुळे तेथे एपीएल कार्डधारकांना धान्य मिळू शकेल.
जिल्ह्यात एपीएल कार्डधारकांची संख्या ही १३ लाख ४७ हजार ८७० एवढी आहे, तर जिल्हाभरात २४६३ क्विंटल गहू आणि ६९२ क्विंटल तांदूळ शिल्लक आहे. यावल, रावेर आणि सावदा येथे असलेल्या शासकीय गोदामांमध्ये या योजनेचे धान्यच शिल्लक नाही. त्यामुळे या गोदामांशी संलग्न दुकानदार आणि कार्डधारकांना धान्यच मिळणार नाही.
राज्य शासनाने मागील वर्षी जाहीर केलेल्या योजनेतून शिल्लक साठा नागरिकांना देण्याचे जाहीर केले तेव्हा जळगाव जिल्ह्यात जवळपास तीन हजार मेट्रिक टन धान्य असल्याचे म्हटले होते. मात्र, आता पुरवठा विभागाने या योजनेतील धान्यसाठा जेव्हा तपासला, तेव्हा मूळ आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी राज्य शासनाला कळविण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यात या योजनेतील धान्याचे नियतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केले आहे.
कुठे किती आहे शिल्लक साठा
जळगावच्या गोदामात फक्त १२०२ क्विंटल गहू शिल्लक आहे, तर दुकानांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ ८.२० क्विंटल आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी फारसा गहू किंवा तांदूळ शिल्लक नाही. जामनेरला ४९.५० क्विंटल गहू आणि १४४.७३ क्विंटल तांदूळ आहे. बोदवड, यावल, रावेर, सावदा, भडगाव, चाळीसगाव आणि अमळनेर येथील गोदामात देखील धान्यसाठा शिल्लक नाही.
जिल्ह्यातील एकुण एपीएल कार्डधारक १३ लाख ४७ हजार ८७०
शिल्लक धान्य
गहू २४६३ क्विंटल
तांदूळ ६९२ क्विंटल
मंजूर केलेले धान्य
गहू १ किलो (प्रतिव्यक्ती)
तांदूळ १ किलो (प्रतिव्यक्ती)