चार मार्केटच्या जागेच्या नोटीसवर मनपा न्यायालयात दाद मागणार
By admin | Published: March 20, 2017 12:30 AM2017-03-20T00:30:25+5:302017-03-20T00:30:25+5:30
स्थायी समितीच्या सभेत निर्णय : अशासकीय प्रस्ताव अजेंड्यावर
जळगाव : महात्मा फुले मार्केटसह चार मार्केटची जागा शर्तभंग झाल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेण्याच्या मिळालेल्या नोटीसविरोधात मनपा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठीचा अशासकीय प्रस्ताव सोमवार, २० रोजी दुपारी १२ वाजता मनपात आयोजित स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणार आहे.
शासनाचे महसूल विभागाचे उपसचिव डॉ.संतोष भोगले यांनी २२ फेब्रुवारी २०१७ रोजीच जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून जळगाव शहर सिटी सव्हे नंबर १९३८/३७/ब-१ ही व्यापारी संकुले असलेली मुळची शासकीय जागा मालकी हक्काने मिळण्याबाबत महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांच्या सहकारी फेडरेशनच्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे अहवाल शासनास प्राप्त झाले. त्या अनुषंगाने या व्यापारी संकुलाची जमीन ही ‘ब’ सत्ता प्रकाराची असून दैनिक बाजार व आठवडे बाजार या प्रयोजनार्थ निरंतर वापरासाठी शासनाने प्रदान केलेली आहे. मात्र याप्रकरणी तत्कालीन नगरपालिकेने या जमिनीच्या वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अथवा शासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असताना अशी कुठलीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने याप्रकरणी शर्तभंग झालेला दिसून येत आहे.
ही जमीन शर्तभंगाच्या कारणास्तव सरकारजमा का करण्यात येऊ नये? याबाबत मनपास कारणे दाखवा नोटीस देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे व त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे या पत्रात सूचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी मनपाला नोटीस बजावून ७ दिवसांत खुलासा मागविला होता. मात्र मनपा प्रशासनाने १ महिन्याची मुदत मागितली आहे. दरम्यान या नोटीसच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात मनपाची बाजू मांडण्याबाबतचा नितीन बरडे यांनी दिलेला अशासकीय प्रस्ताव सोमवार, २० रोजीच्या स्थायी समिती सभेसमोर मांडण्यात येणार आहे. त्यात चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.