सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले अन् ८ टन साहित्य केरळकडे रवाना झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:49 PM2018-08-28T18:49:20+5:302018-08-28T18:51:38+5:30
केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले.
जळगाव : केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले.
यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाद्वारे केरळ पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी धनादेशद्वारे मदत पाठविली तर काहींनी जीवनावश्यक साहित्य दिले.
या उपक्रमात सैन्यातील काही अधिकारी, जवान मदतीसाठी धावून आले असून त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वैयक्तिक मदत सोपविली आहे. शहिद जवानांच्या कुटुंबासाठी केलेले कार्य तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेवर सैन्यासोबत डॉ.धर्मेंद्र पाटील आणि सहकारी करीत असलेल्या आरोग्य सेवेमुळे सैन्यातील अधिकारी, जवानही पुढे सरसावले आहेत. यासोबतच प्रशाकीय अधिकारी यांनीदेखील मदतीचा हात दिला आहे. देणगीदार हे मुख्यत: जळगाव आणि नाशिक जिह्यातील आहेत.
मदतीचे हे साहित्य नाशिक रेल्वे स्थानकावरून पाठविण्यात आले. फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक ऋषिकेश परमार यांनी बरेच साहित्य नाशिक येथून खरेदी केले. त्यासाठी जळगाव येथून संंस्थेने संबंधितांना धनादेश दिले.
अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्यासह सचिव डॉ.राहुल महाले, खजिनदार शलाका पाटील, डॉ.राहुल महाजन, डॉ.जितेंद्र मोरे, रवींद्र पाटील नाशिकचे समन्वयक ऋषिकेश परमार, अक्षय भावसार यांनी मदतनिधी, जीवनावश्यक साहित्य जमा करण्यासाठी प्रयत्न केलेत.