अंजली दमानियांचा कायमस्वरुपी गैरहजेरीसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 06:26 PM2018-09-06T18:26:18+5:302018-09-06T18:26:38+5:30
रावेर : पुढील सुनावणी १५ आॅक्टोबरला
रावेर, जि.जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी रावेरन्यायालयात दाखल खटल्यात गुरुवारी त्या हजर झाल्या. या वेळी त्यांनी याप्रकरणी दाखल असलेले सर्व खटले एकाच ठिकाणी चालविण्यात यावे यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात निर्णय लागत नाही तोपर्यंत कायमस्वरुपी सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्यासाठी परवानगी मिळावी या आशयाचा अर्ज न्यायालयात दिला.
सामाजिक कार्यकर्र्त्या अंजली दमानिया यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपाचीही बदनामी केली. याबाबत त्यांच्याविरूध्द रावेर न्यायालयात २८ जून २०१६ रोजी भादंवि कलम ४९९ व ५०० अन्वये फौजदारी खटला (क्र.४००/१६) फौजदारी खटला दाखल केला होता. त्या खटल्यात सुनावणीकामी अंजली दमानिया दुपारी रावेर न्यायालयात त्यांचे वकील अॅड.सुधीर कुलकर्णी यांच्यासह उपस्थित झाल्या होत्या.
त्यांच्या खटल्याची सुनावणी सुरू असलेल्या न्यायासनावरील न्या.अनुप जयस्वाल रजेवर असल्याने सहदिवाणी न्या.आर.एल.राठोड यांच्या न्यायासनासमोर फिर्यादी सुनील पाटील, त्यांचे वकील अॅड.चंद्रजीत पाटील, अॅड.तुषार माळी व आरोपी अंजली दमानिया व त्यांचे वकील अॅड.सुधीर कुलकर्णी यांचा पुकारा करण्यात आला. यावेळी फिर्यादी पक्ष अनुपस्थित होता. दरम्यान, अंजली दमानिया यांनी राज्यात खडसे व भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी राज्यात दाखल झालेली २८ दाव्यांचे एकत्रीकरण करून त्यांची एकाच ठिकाणी सुनावणी घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील निर्णय होईपर्यंत सदरील दाव्याच्या सुनावणीसाठी कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, असा विनंती अर्ज न्यायासनासमोर दिला. मात्र, सदरील दावा नियमित सुरू असलेल्या न्यायासनासमोरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असा निर्णय देत न्या.आर.एल.राठोड यांनी पुढील सुनावणीकरीता ५ आॅक्टोबर ही तारीख दिली.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, भाजपा पक्ष एकाच जिल्ह्यात १५ ठिकाणी पक्षाची बदनामी केल्याचा फौजदारी खटला दाखल करण्याची परवानगी तरी कसा देऊ शकतो, असा सवाल उपस्थित करून हा छळ करण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पाठीच्या मणक्यांच्या स्नायूंवर पूर्णत: शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पाठीच्या मणक्यांमध्येच त्यांना मोठा हर्निया आढळून आल्याने दोन्ही मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांपासून फिजीओथेरपीचे उपचार सुरू असून, तास दीड तास जरी पाठीवर झोपून प्रवास केला तरी पाठ पूर्णपणे दगडासारखी टणक होऊन कमालीच्या वेदना होत असतात. म्हणून अजून एक वर्ष फिजीओथेरपीचे उपचार सुरू ठेवण्याचा वैद्यकीय सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. असे असले तरी मी पूर्णपणे तंदुरुस्त असून, केसेसविरूद्ध खंबीरपणे लढण्यासाठी तयार आहे. मुंबईहून एकाच वेळी २८ ठिकाणी त्याच संदर्भातील दाव्यांचे सुनावणीकामी फिरणे अशक्य असल्याने एकाच ठिकाणी सदरील दाव्यांचे एकत्रित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय होईपावेतो कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा मिळण्याचा अर्ज सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने निष्काषित केला असून, दुसरा गुन्हा निष्काषित करण्यासंबंधी ३ आॅक्टोबरला सुनावणी ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रावेर न्यायालयात अंजली दमानिया येणार असल्याची कुणकुणही कुणाला नसल्याने त्या अगदी सामान्यपणे न्यायालयाच्या आवारात वावरत होत्या.
दरम्यान, भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी जमीन भूसंपादनाची काही माहिती अवगत करून त्यासंदर्भात मात्र प्रतिक्रिया देण्यास टाळले.