वाळू तस्करांना मोक्का लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:23 PM2019-02-01T12:23:07+5:302019-02-01T12:23:46+5:30
तितूर नदीपात्रालगत हिंगोणेवासियांचे उपोषण
चाळीसगाव: हिंगोणे सीम गावालगत असणा-या तितूर नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणा-या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्यांची संपत्तीही जप्त करावी. या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून त्यांनी तितूर नदीपात्रालगत उपोषणासाठी ठिय्या मांडला आहे. वाळू तस्करी प्रकरण चांगलेच तापल्याने प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान पुन्हा पंचनामा झाल्याने महसुल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले जात आहे.
२२ रोजी पहाटे चार वाजता स्वत: ग्रामस्थांनी वाळू चोरीचा प्रकार समोर आणला. गेल्या वर्षभारापासून तितूर नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतुक होत असल्याच्या तक्रारी गावक-यांनी महसुल विभागाकडे केल्या होत्या. वाळू उपसा करण्यात येऊ नये. असा ठरावही ग्रामपंचायतीने केला आहे. मात्र त्याची दखल न घेतल्याने वाळू तस्करांची मुजोरी वाढली होती. यानंतर भाजपाचा माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी याच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
गुरुवारी पुन्हा झाला पंचनामा
२२ रोजी झालेल्या पंचनाम्याबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित करुन आक्षेपही घेतल्याने गुरुवारी दुपारी चार वाजता चाळीसगाव विभागाचे प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थित सार्वजनिक पाटबंधारे विभागाने वाळू उपसा झालेल्या जागेचा स्थळ पंचनामा केला. दुपारी चार पर्यंत हे मोजमाप सुरु होते. यावेळीही अधिका-यांसमोर गावक-यांनी वाळू वाहतूक करणा-यांवर कठोर करण्याची संतप्त मागणी केली. उपोषण स्थळी माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, अरविंद चव्हाण, बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहे.
# आज दुपारी अहवाल येणार
५२ घनफूट की १५ लाख घनफूट वाळू उपसा झाला ? हे सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी गुरुवारी स्थळ पंचनाम्यावरुन समोर येणार आहे. हा अहवाल शुक्रवारी दुपारी ते प्रांताधिका-याकडे सादर करणार असल्याने अहवालात काय दडले आहे. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
...
हिंगोणे सीम तितूर नदीपात्रात वाळू उपसा झालेल्या जागेचा गुरुवारी पुन्हा पंचनामा करण्यात आला. शुक्रवारी दुपारी सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- शरद पवार
प्रांताधिकारी, चाळीसगाव विभाग