बनावट कागदपत्रांद्वारे ‘मदतनीस’ नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:22 AM2017-03-17T00:22:52+5:302017-03-17T00:22:52+5:30
बालविकास प्रकल्प : गुन्हा दाखल करण्याचे आदेश
चाळीसगाव : अंगणवाडी मदतनीससाठी बनावट गुणपत्रक सादर करून नोकरी मिळवली म्हणून बालविकास प्रकल्पाधिकारी लता दगाजी पवार व कनिष्ठ सहायक जे.बी. पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांनी दिले आहे.
तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे नेमणूक झालेल्या रुपाली बाबूराव भाबड यांची नियुक्ती रद्द करून त्या जागी आशा विश्वास मोरे यांची निवड करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
2015-16 मध्ये तालुक्यात अंगणवाडी व मदतनीससाठी झालेल्या भरती प्रक्रियेत करजगाव येथील आशा विश्वास मोरे यांना डावलून त्या जागी रूपाली बाबूराव भाबड यांची निवड प्रकल्पाधिका:यांनी केली होती.
याप्रकरणी आशा मोरे यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, भाबड यांच्या इयत्ता सातवीच्या गुणपत्रकात 242 अधिक 15 गुण असताना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने दिलेले गुण खाडाखोड केलेले असून त्यात त्यांनी 442 गुण दर्शविले होते.
याबाबत संबंधितांनी कागदपत्रांची पडताळणी न करता भाबड यांना मदतनीस म्हणून नियुक्तीपत्र दिले. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरार्पयत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल नव्हता.
(वार्ताहर)