मोहाडी रुग्णालयात फिजिशियन नियुक्तीचा होऊ शकतो गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:46+5:302021-07-21T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना मोहाडी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना मोहाडी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मोहाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या ठिकाणी गंभीर रुग्णांनाही दाखल केले जाणार आहे. मात्र, फिजिशियनच्या नियुक्तीवरून गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोहाडी येथे फिजिशियन नसल्यानेच गंभीर रुग्णांना या ठिकाणी दाखल केले जात नव्हते, मात्र, या ठिकाणी पूर्णत: कोविड करण्याचे नियोजन असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिशयन या ठिकाणी नियुक्त केले जातील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र, याबाबत अद्याप स्पष्ट आदेश आलेले नाही. त्यातच आम्ही आयसीयूसाठी मदतीचा हात देणार असे सांगत मोहाडी रुग्णालयात फिजिशियन पाठविणार की नाही, याबाबत मात्र, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी स्पष्ट सांगणे टाळले आहे.
अशी आहे स्थिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत ९ फिजिशियन आहेत. दरम्यान, कोविडच्या अतिदक्षता विभागात सद्या पाच रुग्ण उपचार घेत असून अन्य सहा रुग्ण हे अन्य कक्षात उपचार घेत आहेत. मोहाडी येथील आयसीयू कार्यान्वयीत झाल्यानंतर त्या ठिकाणी या गंभीर रुग्णांना हलविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फिजिशियनची गरज लागणार आहे. त्यामुळे जीएमसीतील किती फिजिशियन त्या ठिकाणी नेमले जावू शकतात, हे अद्याप स्पष्ट नाही. अन्य मनुष्यबळ पूर्ण असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे.
कर्मचाऱ्यांना सूचना, जुना आयसीयू कोविडसाठी
नॉन कोविड करण्याची घोषणा झाल्यानंतर आता याबाबत संबधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जुना अतिदक्षता विभाग हा कोविडसाठी राखीव राहणार असून त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ राहणार आहे. गुरूवारी आपात्कालीन कक्षही नेहमीच्या जागेवर सुरू होणार आहे. बुधवारी सायंकाळी किंवा गुरूवारी या ठिकाणचे कोविड रुग्ण हे मोहाडी येथे हलविण्यात येतील, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. सर्व कक्षांमध्ये फवारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.