शहरातील कामांचा दर्जा तपासण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:59+5:302021-04-23T04:17:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भविष्यात शहरातील विकास कामांमध्ये निकृष्ट काम करणारा मक्तेदारांवर लक्ष ठेवण्यासाठी व कामांचा दर्जा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भविष्यात शहरातील विकास कामांमध्ये निकृष्ट काम करणारा मक्तेदारांवर लक्ष ठेवण्यासाठी व कामांचा दर्जा तपासण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दोन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांना शहरातील विकास कामांच्या गुणवत्तेचा दर्जा तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या, या सूचनांची अंमलबजावणी मनपा प्रशासनाने केली आहे.
मनपाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मनपाचे अनुभवी अभियंता नरेंद्र जावळे यांची प्रभाग क्रमांक १ ते १० साठी व तर विलास सोनवणी यांची प्रभाग क्रमांक ११ ते १९ साठी करण्यात आली आहे. सागर पार्क च्या निकृष्ट कामानंतर महापौरांनी शहरातील विविध विकास कामांची गुणवत्ता तपासूनच मक्तेदाराला बिल अदा करण्यात यावेत, तसेच या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी असे पत्र मनपा आयुक्तांना दिले होते. महापौरांच्या पत्रानंतर आयुक्तांनी याबाबत आदेश काढले असून २ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
कामांचा दर्जा पाहूनच बिलांची रक्कम मिळणार
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबतचे गुरुवारी आदेश काढले आहेत. शहरातील जे काम सद्यस्थितीत सुरू आहेत, त्या कामांची तपासणी देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. या सहज जी कामे झाली आहेत मात्र अद्याप बिलांची रक्कम संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेली नाही अशा कामांची तपासणी देखील आता केली जाणार आहे. कामाची गुणवत्ता चांगली राहिली तरच संबंधित ठेकेदाराला बिलांची रक्कम अदा करण्यात येईल असेही मनपा आयुक्तांनी केलेल्या आदेशात म्हटले आहे.