पात्रता न पाहता तालुका वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:11 AM2021-07-09T04:11:29+5:302021-07-09T04:11:29+5:30
रावेर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथरोगाचा प्रसार सुरू असताना ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची नस ज्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ...
रावेर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथरोगाचा प्रसार सुरू असताना ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची नस ज्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हातात आहे, त्याचं पदावर सक्षम अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्याऐवजी सक्षम अर्हताधारक नसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा अनागोंदी कारभार जि.प. आरोग्य विभागात सुरू असल्याचा आरोप दिनेश भोळे या माहिती अधिकार कार्यकर्त्यांने केला आहे.
याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारींकडे हेतुतः दुर्लक्ष केले जात असल्याचे भोळे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथरोगाचा प्रादुर्भाव असताना शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याची धुरा सांभाळताना प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करणे, प्रतिबंधक औषधोपचार करणे, संशयितांची कोरोना चाचणी करणे, कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरला दाखल करणे यासह शासनस्तरावर अहवाल सादर करणे व होणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करणे तथा कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम व व्यवस्थापन राखणे अशी महत्त्वाची जबाबदारी असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी या वर्ग क्रमांक १ च्या पदस्थापनेत एम.बी.बी.एस. या सक्षम शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे अनिवार्य होते. शासनाच्या आरोग्य सेवा विभागातील मानकांप्रमाणे तालुका वैद्यकीय अधिकारी पदावर एम.बी.बी.एस. शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे संकेत असताना व तालुक्यातील जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस शैक्षणिक पात्रता अर्हताधारक असतांना मात्र त्यांना डावलून चक्क बी.ए.एम.एस. ही तत्सम वैद्यकीय पदवी प्राप्त चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांच्याकडे हा तालुका वैद्यकीय अधिकारीपदाचा पदभार सोपवण्यात आल्याची बाब उघड झाल्याची लेखी तक्रार दिनेश भोळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे २२ मार्चपासून केली आहे. तरी हा अनागोंदी कारभार थांबवून सत्वर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १९ जून रोजी तक्रारदार दिनेश भोळे यांनी केली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारीपदी एमबीबीएस, सेवाज्येष्ठ, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारा पात्र लाभार्थी असावा, असे निकष असले तरी दुसरीकडे यावल, चोपडा व धरणगाव येथेही तालुका वैद्यकीय अधिकारीपदी बीएएमएस डॉक्टरांची थेट नियुक्ती शासनाने केली असल्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रावेर तालुका वैद्यकीय अधिकारीपदाची नियुक्ती केली आहे. यापूर्वीही अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी पदावरही बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याचे दाखले आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी योग्य तो धोरणात्मक निर्णय द्यावा, अशा अभिप्रायासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला आहे.
. -डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगाव