आगामी दोन दिवसात प्रभारी प्र-कुलगुरूची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:41+5:302021-03-14T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्र-कुलगुरुपदसुध्दा संपुष्टात आले होते. आता नुकतीच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्र-कुलगुरुपदसुध्दा संपुष्टात आले होते. आता नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठातापदी आर. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित प्रभारी अधिष्ठाता कायम आहेत. येत्या दोन दिवसात प्रभारी प्र-कुलगुरू यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा चांगला अभ्यास असणाऱ्या व्यक्तीकडेच हा पदभार देण्यात येईल, अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सोमवार, ८ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा. ई. वायुनंदन यांनी स्वीकारला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न : अर्थसंकल्पाची बैठक कशी घेणार?
ई. वायुनंदन : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. विद्यापीठात शासनाच्या सूचनांचे परिपूर्ण पालन केले जाईल. येत्या २५ मार्चला अर्थसंकल्पावर सिनेटची सभा आहे. दरम्यान, ही सभा कशी घ्यावी, यासाठी सोमवारी सर्वांशी चर्चा केली जाईल. चर्चेअंती जो निर्णय घेण्यात येईल, तो सर्वांना कळविण्यात येईल.
प्रश्न : नॅक पुनर्मूल्यांकनासाठी प्रस्ताव पाठविला का?
ई. वायुनंदन : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनासाठी सज्ज आहे. नॅक संदर्भातील जबाबदारी ही प्रा.विजय माहेश्वरी यांच्याकडे सोपविली आहे. सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यात नॅक संस्थेला पुनर्मूल्यांकनासाठीचा प्रस्ताव सादर केला जाईल. यंदा चांगले मूल्यांकन मिळावे, यासाठी सर्वांनी चांगले प्रयत्न केले आहे.
प्रश्न : कुलगुरू प्रक्रिया कधी होईल?
ई. वायुनंदन : कुलपती यांच्या निर्देशानुसार कुलगुरू शोध समिती नियुक्ती केली जाईल. ही पाच सदस्यीय समिती असेल. या समितीसाठी विद्यापीठाकडून दोन व्यक्तींची नावे पाठविण्यात येईल. ही नावे एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाठविण्यात येईल. संपूर्ण प्रक्रियेसाठी विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही केल्या जातील. दरम्यान, विद्यापीठातील कामकाज सुरळीत सुरू असून सर्वांना एकत्र व सोबत घेऊन काम केले जाईल.
सुरक्षा रक्षकांना मिळाले वेतन
विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांचे सुमारे तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुरक्षा रक्षकांचा वेतनाचा प्रश्न सोडविला असून त्यांना दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. येत्या सोमवार, मंगळवार पर्यंत उर्वरित एका महिन्याचे थकीत वेतनही अदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील.
- ई. वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ