मुुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील चार शिक्षकांच्या मान्यता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 07:03 PM2019-01-01T19:03:33+5:302019-01-01T19:07:04+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, प्रतीक पंडित तायडे व सतीश प्रभाकर पाटील या चार शिक्षकांचा समावेश आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, प्रतीक पंडित तायडे व सतीश प्रभाकर पाटील या चार शिक्षकांचा समावेश आहे.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ अंतुर्ली संचलित मि.फ.तराळ विद्यालयात शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षक भरतीला शासनाकडून बंदी असताना करण्यात आल्या. नेमणुका बॅक डेटेड दाखवून मान्यता घेण्यात आली. संस्थेने शिक्षक भरतीचे ठराव वेगवगळे केले आणि चारही शिक्षकांना एकाच आदेशात नियुक्ती पत्र दिले. तसेच हमीपत्रसुद्धा सर्वांचे एकत्र घेतले. यासह अन्य मुद्यांच्या आधारे चारही शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याची तक्रार होमराज बळीराम महाजन यांनी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली होती. शिक्षण उपसंचालकांनी चौकशी लावली. सुनावणीत व दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. चौकशी अधिकारी म्हणून उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी शिक्षक भरतीसंदर्भातील दिलेला अहवाल गृहीत धरून मि.फ.तराळ विद्यालयातील या चारही शिक्षकांची मान्यता शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी रद्द ठरवली आहे.
दरम्यान, राजकीय सूड भावनेने सदर शिक्षकांचे भविष्य खराब करण्याचा हा प्रकार होय, यावर शिक्षण संचालकांकडे दाद मागण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे.