पारोळा पंचायत समिती सभापतींवर अविश्वास प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 05:10 PM2018-08-21T17:10:11+5:302018-08-21T17:10:33+5:30
विकास कामात विश्वासात घेत नसल्याचा सदस्यांचा आरोप
पारोळा, जि.जळगाव : येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील यांच्यावर सहा विरुद्ध एक मतांनी हात वर करून अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पुढील सभापती छायाबाई राजेंद्र पाटील यांच्या सभापती होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच पंचायत समिती सभापती पदासाठीची तारीख लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे.
पंचायत समिती सभागृहात प्रभारी तहसीलदार पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्तावावर बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेचे सदस्य सकाळी ११ वाजता सभागृहात दाखल झाले. उपसभापती ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, अशोक नगराज पाटील, छाया राजेंद्र पाटील, प्रमोद रमेश जाधव दाखल झाले, मात्र सभापती सुनंदा पाटील ह्या न आल्याने १० मिनिटांचा कालावधी देऊन सभाचे कामकाज थांबविण्यात आले. सकाळी ११.१५ वाजता सभापती सुनंदा पाटील सभागृहात दाखल झाल्यानंतर अविश्वास प्रस्तावावरील विषयांना सुरुवात करण्यात आली. तीन विषयावर अविश्वास दाखल करुन त्या विषयांचे स्पष्टीकरण करण्यात येवून हात वर करून सहा विरुध एक मतांनी अविश्वास दाखल करण्यात आला. त्यात भाजपाच्या सुजिता बाळासाहेब पाटील ह्या गैरहजर होत्या. अविश्वासाचे लिखित कामकाज करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सभापतीची तारीख जाहीर होणार आहे. या अविश्वास प्रस्ताव कामकाजासाठी पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक एस.एस. निंबाळकर, के.एम.पाटील यांनी सहकार्य केले
अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी कोणकोणत्या विषयावर झाली चर्चा
पंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील ह्या विकास कामात विश्वासात न घेता काम करतात. ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प झालेली असून सभापती हे आपल्याच मतदारसंघात काम करतात आमच्या मतदारसंघात कामे होत नसल्याचा आरोप आहे.
सभापती सुनंदा पाटील यांचे पती पांडुरंग पाटील हेच सभापती पदाचे कामकाज करीत असल्याचा आरोप आहे या तीन विषयावर सभापती व सदस्य यांचे मत मांडण्यात आले