पकडलेल्या गायींना खावटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:51 PM2021-05-24T19:51:02+5:302021-05-24T19:53:36+5:30
अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा न्यायालयाने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा येथील न्या. एफ. सिद्दीकी यांनी दिला आहे. या गायी सध्या आरवे येथील गोशाळेत आहेत.
एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षा समिती सदस्य हेमंत गुरव याने पोलिसांना दिली. यावरुन हे वाहन पाचोरा पोलिसांनी जप्त केले.
त्यानंतर या पाच गायींना आरवे येथील गोपाळकृष्ण शर्मा यांच्या गोशाळेत दाखल करण्यात आले. या गायींच्या पालन पोषणासाठी त्यांना खावटी मिळावी म्हणून पाचोरा येथील गोसेवक ॲड. चंद्रकांत शर्मा यांनी पाचोरा न्यायालयात अपील दाखल केले. पाचोरा येथील न्या. एफ. सिद्दीकी यांनी हे अपील मान्य करीत पाच गायींना प्रत्येकी प्रतिदिवस रु ७५ प्रमाणे खावटी व्यापारी जावेद खालिद कुरेशी याने गोशाळेस देण्याचा आदेश दिला.
दरम्यान, खावटीची रक्कम आणखी वाढवून मिळावी, यासाठी ॲड. शर्मा जळगाव येथील सेशन कोर्टात अपील दाखल केले आहे. त्यात गायींच्या पालन पोषणासाठी प्रत्येक गायीमागे प्रति दिन ३०० रुपये खावटी मिळावी, अशी मागणी केली आहे.