विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारा विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:10+5:302021-06-30T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२१-२२ च्या ३०५.१७ कोटी रुपयांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२१-२२ च्या ३०५.१७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी झालेल्या अधिसभेच्या ऑनलाइन बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात ३७.६१ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण व आदिवासी भागातील असून त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या गरजा व अपेक्षा तसेच यात मोठ्या प्रमाणावर झालेले बदल, ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार या बाबींचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अर्थसंकल्पाची अधिसभा बैठक पार पडली. २५ मार्च रोजी अधिसभेची बैठक तहकूब झाली होती ती बैठक मंगळवारी घेण्यात आली. यावेळी बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. विकासाला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कारासाठी २५ लाख, स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षासाठी २५ लाख तसेच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल मोलगी येथे विद्यापीठ संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी ४० लाखाची तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
खर्चात बचत करून तूट भरून काढण्याचा संकल्प
अर्थसंकल्पात परिरक्षणासाठी २०१.५८ कोटी रुपये, योजनांतर्गत विकासासाठी ६२.३३ कोटी आणि विशेष कार्यक्रमांसाठी, योजनांसाठी ५१.२६ कोटी अशी एकूण खर्चासाठी ३०५.१७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात उत्पन्नासाठी तरतूद २६७.५६ कोटी इतकी असल्यामुळे ३७.६१ कोटी रूपये इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. खर्चात बचत करून ही तूट भरून काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
आदिवासी भागांमध्ये संशोधन प्रकल्प राबविले जाणार
नंदुरबार येथील आदिवासी अकादमी अंतर्गत नावीन्यपूर्ण प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात एक कोटी पाच लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात आंतरशाखीय विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांकडून आदिवासी ग्रामीण भागातील उपक्रमांसाठी विविध संशोधन प्रकल्प राबविले जाणार आहेत. सहयोगी सहकारी शिक्षण सहाय्य या योजनेंतर्गत संशोधन करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव यावा म्हणून ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी २५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प ही नवीन योजना राबविण्यासाठी ५० लाख रूपयांची, विद्यापीठ प्रशाळा केंद्र व उपकेंद्रासाठी १३.४९ कोटी, परीक्षा व मूल्यमापन विभागासाठी २६.८२ कोटी, विद्यार्थी कल्याण विभागासाठी ६.२५ कोटीची तरतूद असून यात कमवा व शिका योजना, युवारंग, दत्तक योजना, विद्याधन योजना आदी ३७ योजनांचा समावेश आहे. क्रीडांतर्गत १३ योजनांसाठी १ कोटी ५५ लाख, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहासाठी ४० लाख, ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी २६ लाख, आरोग्य केंद्रासाठी २१ लाख, बहिणाबाई अध्यासन भवनासाठी १.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बस पास सवलत योजना सुरू राहणार
शिक्षण, आरोग्य, साहित्य अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक अथवा अशैक्षणिक पात्रता धारक असलेल्या मान्यवरांचा अहवाल प्रस्ताव मागवून त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार २०२१-२२ पासून देण्यात येणार असून त्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे म्हणून मोलगी येथे विद्यापीठ संचलित महाविद्यालयासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज बस पास ५० टक्के सवलत योजना सुरू राहील.