चुंचाळे सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:56+5:302021-06-09T04:20:56+5:30
चुंचाळे, ता. यावल : येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सोमवारी पारीत झाला. ...
चुंचाळे, ता. यावल : येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सोमवारी पारीत झाला. ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदारांनी घेतलेल्या विशेष सभेत उपसरपंचासह नऊ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान करीत नऊविरुद्ध एक असा प्रस्ताव पारीत झाला.
सरपंच सुनंदा पाटील या तीन वर्षांपूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये सरपंचपदावर विराजमान झाल्या होत्या. काही महिन्यांपासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाही, म्हणून ३१ मे रोजी तहसील कार्यालयात त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर सोमवारी तहसीलदार महेश पवार यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीत सायंकाळी ४ला विशेष सभा घेतली.
या सभेत सरपंचांविरुद्ध उपसरपंच नाजिमा अन्वदर तडवींसह सुकलाल पाटील, अनिल कोळी, अरमान तडवी, दगडू तडवी, प्रा.शारदा चौधरी, नैसाद तडवी, जयनूर तडवी व सिंधुबाई पाटील यांनी मतदान केले व नऊविरुद्ध एक असा अविश्वास प्रस्ताप पारीत झाला.