एरंडोलला चाकूचा धाक दाखवित चोरी, ४ लाख ६० हजारचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 04:01 PM2019-03-17T16:01:36+5:302019-03-17T16:01:55+5:30
दोन ठिकाणी चोरट्यांनी केला हात साफ
एरंडोल : येथे रविवारी भल्या पहाटे लक्ष्मीनगरात अॅड. तुषार पाटील यांच्याकडे व साईनगरात गौरव ढोमने यांच्याकडे अज्ञात चोरट्यांंनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे नवीन कॉलन्यांमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
एरंडोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल येथे लक्ष्मीनगरात अॅड. तुषार पाटील यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरात सर्वजण झोपलेले असताना चोरट्यांंनी कपाटातील २० हजार रुपयांची रोकड व १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा ६० ग्रॅम सोन्याचा राणीहार, १८ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅम सोन्याचे झुमके, १ लाख २० हजार रुपये किंमतीची ४० ग्रॅम सोन्याची मंगलपोत, २१ हजार रुपये किंमतीची ७ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किंमतीच्या १० ग्रॅम सोन्याच्या लहान मुलांच्या अंगठ्या अशा एकूण ३ लाख ८९ रुपये किंमतीचा माल लंपास करुन धुम ठोकली. तत्पूर्वी वकिलांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढत असताना त्यांना जाग आली व त्यांनी आवाज दिला असता असता अॅड. पाटील जागे झाले.
चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला अंडर पॅण्ट व बनियान परिधान केलेला व हातात चाकू असलेला व्यक्ती समोर दिसला. मी वकील आहे, मी तुला सोडणार नाही. असे अॅड. पाटील यांनी सांगितले असता पप्पा लवकर पो. स्टे. ला कळवा असे त्यांच्या सहा वर्षीय मुलगा अजिंक्य याने वकीलांना सांगितले. त्यावेळी शेजारी संदीप पवार व देशमुख जागे झाले व धावत आले. दरम्यान घरातील तीन चोर व बाहेर पाळत ठेवून असलेले चोर पसार झाले.
तत्पूर्वी साईनगरात चोरट्यांंनी भिंतीच्या कुंपनाची जाळी कापून घराच्या मागील दरवाजा उघडून गौरव ढोमने यांच्या घरात प्रवेश करून १२ हजार रु. रोख व ३० हजार रु किंमतीचा लॅपटॉप, दोन मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजार रु. किमंतीचा ऐवज लांबविला.
गौरव यांच्या शालकाला शौचालयत डांबून व गौरव यांना लोखंडी सळईने मारहाण केली. त्यात
त्यांच्या मानेला मार लागून जखमी झाले. ‘पैसे कहाँ है..’ अशी विचारणा चोरट्यांनी केली. मात्र गौरव यांनी काहीही उत्तर दिले नाही.
या प्रकरणी एरंडोल पो. स्टे.ला भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पथक मागविण्यात आले असता या पथकाने फिर्यादीच्या घरापासून धरणगाव रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला. पो.नि. अरुण हजारे व उप निरीक्षक प्रदीप चांदोलकर हे तपास करीत आहेत.
चोरीच्या दोन्ही घटनांच्या संबंध दुचाकी चोरीशी ?
एरंडोल शहरापासून थोड्याच अंतरावर नंदगाव रस्त्यालगत साईनगरला जोडणाऱ्या रस्त्याजवळ खुशाल महाजन यांचे शेत असून ते पोल्ट्री फार्मवर झोपले असताना अज्ञात चोरट्यांंनी त्यांची दुचाकीचे कुलूप तोडून दुचाकी लंपास केली. अज्ञात चोरट्यांकडून या दोन्ही घटनांमध्ये या दुचाकीचा वापर झाला असावा असे सांगितले जात आहे. खुशाल महाजन यांनी दुचाकी चोरी बाबत एरंडोल पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.