सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:12 AM2020-06-10T11:12:43+5:302020-06-10T11:13:02+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : ममुराबादच्या १५ ग्रामपंचायत सदस्यांचा खर्चाला विरोध, बडतर्फीची मागणी
ममुराबाद, ता. जळगाव : ग्रामपंचायतीत सध्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार सुरू असून, चौदाव्या वित्त आयोगासह ग्रामनिधी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी खर्च करताना बिले टाकून पैसे काढण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप सुमारे १५ सदस्यांनी केला आहे. तसेच संबंधित सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाची साथ रोखण्यासाठी गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने खर्च केला आहे. मात्र, औषध फवारणीचे बिल हे कमी असताना, त्यासाठी चुकीचे बिल टाकून जास्त पैसे काढण्याचा प्रकार घडला आहे. शासनाची कोणतीच परवानगी न घेता चौदाव्या वित्त आयोगात तरतूद नसतानाही आरोग्य विषयावर प्रमाणाच्या बाहेर खर्च केला गेला आहे. या सर्व खर्चाची कोणतीही विचारणा ग्रामपंचायत सदस्यांना करण्यात आलेली नाही किंवा मिटिंगमध्ये अजेंड्यावर विषय घेतलेला नाही. लाखो रुपयांचा खर्च बेकायदेशीररित्या झालेला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
चौदाव्या वित्त आयोगाच्या कृती आराखड्यामध्ये साफसफाईच्या कामाची कोणतीच तरतूद नसताना बेकायदेशीरपणे पैसे काढण्यात आले आहेत. यास सर्वस्वी सरपंच व ग्रामविकास अधिकारी जबाबदार राहतील, असे निवेदनात म्हटले
आहे.
या निवेदनावर उपसरपंच रमाबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या उषाबाई पाटील, पुष्पा ढाके, कोकीळाबाई पाटील, मालुबाई पाटील, मीना शिंदे, प्रमिला चौधरी, शोभा पाटील तसेच सदस्य संतोष पाटील, विजय शिंदे, शरद पाटील, एजाज पटेल, हेमंत चौधरी, शेख सईद व प्रमोद शिंदे या १५ सदस्यांच्या सह्या आहेत.
पाणीपुरवठा योजनेच्या खर्चासही विरोध
ममुराबादच्या सामुहिक पाणीपुरवठा योजनेचे काम आराखड्यानुसार झालेले नसून, संबंधित ठेकेदाराला धनादेश देण्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून शहानिशा झालेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये काही दोष अथवा त्रुटी त्याचप्रमाणे गैरव्यवहार आढळल्यास सरपंच, ग्रामसेवक, संबंधित अभियंता व ठेकेदार हे सर्वजण जबाबदार राहतील. ग्रामपंचायतीने ठेकेदाराला नुकताच दिलेला धनादेश कोणत्याच सदस्याला न विचारता दिला आहे. त्याच्या कायदेशीर कारवाईला पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव हेच जबाबदार राहतील, असे दुसºया एका निवेदनात ग्रामपंचायत सदस्या उषाबाई लोटन पाटील यांनी म्हटले आहे.
ग्रामपंचायतीने चौैदाव्या वित्त आयोगासह पाणीपुरवठा योजनेचा खर्च शासन आदेशानुसार केलेला आहे. त्यासंदर्भात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे.
-बी. एस. पाटील, प्र.ग्रामविकास अधिकारी, ममुराबाद
कोरोनाची साथ रोखण्यासाठी केलेला खर्च हा वित्त आयोगाच्या शिल्लक निधीवरील व्याजाच्या रकमेतून केला आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची रितसर परवानगी घेतली होती.
-भाग्यश्री मोरे, सरपंच, ममुराबाद.