आम्ही पागल आहोत का? लाईनमध्ये थांबलोय ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:37+5:302021-02-11T04:17:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे दिव्यांग प्रमाणपत्रांसाठीचे एकमेव केंद्र असल्याने दर बुधवारी या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे दिव्यांग प्रमाणपत्रांसाठीचे एकमेव केंद्र असल्याने दर बुधवारी या ठिकाणी दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असते. शिवाय वेळेची मर्यादा असल्याने यात प्रचंड गोंधळाचे वातावरण होऊन आधीच शारीरिक त्रासात असलेल्या दिव्यांगांना या ठिकाणी मोठा मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. बुधवारीही तपासणीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली होती.
दिव्यांग तपासणी व त्यांचे प्रमाणपत्र या बाबींचे स्थानिक पातळीवर विकेंद्रीकरण करण्याच्या मुद्याला जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार बगल दिली जात आहे. त्यामुळे दिव्यांगांची फरपट सुरूच आहे. आधीच कोरोनामुळे ९ महिने ही सेवा बंद असल्याने त्यांचे हाल झाले ते वेगळेच मात्र, ही गर्दी नियंत्रणात आणणे प्रशासनाला शक्य होत नसल्याचे दिसते. बुधवारी मानसोपचार विभाग आणि नेत्र कक्ष विभागात दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रचंड गर्दी उसळली होती. लाईन तुटत असल्याचे पाहून अनेक दिव्यांगांनी संताप व्यक्त करीत आम्ही लाईन लावून उभे आहोत, ते पागल आहोत का या शब्दात आपला संताप व्यक्त केला. वेळेची मर्यादा असल्याने गोंधळाचे वातावरण झाले होते.
शासकीय आदेशाला केराची टोपली
महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी या तपासणीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सात पत्र दिली आहेत. वारंवार विचारणा, पत्रव्यवहार करूनही जिल्हा रुग्णालयाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे गंभीर चित्र आहे. किमान दोन ते तीन सेवा जरी उपजिल्हा रुग्णालयात मिळू लागल्या तर दिव्यांगांची ही फरपट थांबेल, सिव्हिलची गर्दी टळेल, असे त्यांनी म्हटले आहे.