वाहतूक निरीक्षकाशी हुज्जत; युनियन सचिवाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:11+5:302021-06-16T04:24:11+5:30
जळगाव : चालक-वाहक यांना ड्युटी देण्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एसटी महामंडळ कार्यालयात वाहतूक निरीक्षक व युनियन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी ...
जळगाव : चालक-वाहक यांना ड्युटी देण्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एसटी महामंडळ कार्यालयात वाहतूक निरीक्षक व युनियन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यात कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव शैलेश नन्नवरे यांनी पदाचा गैरवापर करून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार वाहतूक निरीक्षक मनोज तिवारी यांनी पोलिसात दिली आहे. तसेच तिवारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप नन्नवरे यांनी केला आहे. या गोंधळानंतर दिवसभर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात काथ्याकूट चालू होता. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता नन्नवरे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तिवारी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शैलेश नन्नवरे हे कार्यालयाजवळ आले व मला तुमच्याशी बोलायचं आहे असे सांगून दालनात घेऊन गेले. तेथे आधीच कर्मचारी कैलास साळुंखे व सहायक वाहतूक निरीक्षक महेशकुमार शर्मा उपस्थित होते. त्यांच्यासमक्ष नन्नवरे यांनी तुम्ही ड्युटीवर शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना स्पेअर का देत नाही? असा जाब विचारला. त्यावेळी वाहन उभे असल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्पेअर देऊ शकत नाही? असे तिवारी यांनी नन्नवरे यांना सांगितले असता, त्यांनी आर. डी. कोळी यांना आजचा स्पेअर भरून द्या, असे सांगितले. त्यास आपण नकार दिला असता नन्नवरे यांनी संतापात ''तुझ्या बापाचा डेपो आहे का?'','' ही काय तिवारी ट्रान्सपोर्ट आहे का''? असे म्हणून, बाहेर ये, तुला बघतो, अशी धमकी देत मारहाण केली, असे तिवारी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी गर्दी कमी केली.
दरम्यान, शैलेश नन्नवरे यांनी, आपणास जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली असली तरी गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांना उद्या बोलावण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी ''लोकमत''ला दिली.