सौदार्हपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतिशील होऊ या- अर्जुन खोतकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 01:56 PM2018-01-26T13:56:52+5:302018-01-26T14:01:54+5:30
राज्याच्या विकासाच्या कल्पक आणि नावीन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवून सामाजिक सलोखा, बंधूभाव, सौदार्हपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतिशील होण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करू या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले आहे.
जळगाव - राज्याच्या विकासाच्या कल्पक आणि नावीन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवून सामाजिक सलोखा, बंधूभाव, सौदार्हपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतिशील होण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करू या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले आहे.
येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर खोतकर यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खोतकर म्हणाले की, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतिमान वाटचाल सुरू आहे.
सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता आणि समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरू आहे. देशाच्या प्रगत वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहिलेले आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, कृषी, शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक साधनसंपत्ती, औद्योगिक, पर्यटन यासह वैचारिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच वाटचाल होत राहावी. यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नावीण्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थिताना केले.
या कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून परेडची पाहणी केली. परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक धनजंय पाटील यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय, महिला व पुरुष पथके, वाहतूक शाखा, होमगार्ड महिला व पुरुष पथके, ओरियन इंग्लिश स्कूल, ए. टी. झांबरे विद्यालय, आर. आर. माध्यमिक विद्यालय, मुलजी जेठा विद्यालय, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, ला. ना. माध्यमिक विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल, काशीबाई उखाजी कोल्हे इंग्लिश स्कूल, सेंट टेरेसा इंग्लिश स्कूल, बेंडाळे महिला महाविद्यालय, ॲग्लो उर्दू विद्यालय, श्रीराम माध्यमिक विद्यालय या विद्यालयांच्या एनसीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पथक, आरएसपी पथके, स्काऊट-गाईड पथक, राष्ट्रीय सेवा योजना आदी पथकांनी सहभाग घेतला व शानदार संचलन केले.
तसेच पोलीस दलाचे बॅण्ड पथक, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक, वरुण रथ, निर्भया पथक, महापालिकेचे अग्निशामक व बचाव पथक, ॲम्बुलन्स 108, तसेच मुद्रा बँक योजना प्रचार व प्रसार समन्वय समितीतर्फे तयार करण्यात आलेला प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला व बालविकास विभागाचा बेटी बचाओ बेटी पढाओ, कृषि विभागाचा जलयुक्त शिवार, महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व शिक्षा अभियान, सामाजिक वनीकरण विभागाचा झाडे लावा, झाडे जगवा आदि चित्ररथांनी सहभाग घेतला. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धुनवर झालेल्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण संचलनाने कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार चंदुलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार मंदार कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे उपस्थित होते.