रानभाज्यांचा सुगंध दरवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:42 PM2020-08-10T12:42:25+5:302020-08-10T12:42:36+5:30
उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, आत्मा, कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजन
जळगाव : पावसाळा आठवलं की, तोेंडाला पाणी आणणाऱ्या रानभाज्यांचा घमघमाट जाणवू लागतो. बाजारपेठेत अभावानेच दिसणाºया या रानभाज्यांची चव मात्र अनेकांच्या जीभेवर रेंगाळत राहते. पण याच रानभाज्यांचा सुगंध रविवारी जळगावात दरवळला. अनेक रानभाज्या एकाच छताखाली खरेदी करण्याची संधीही नागरिकांना मिळाली.
निमित्त होते, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र जळगाव व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवचे! या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रोटरी क्लब जळगाव वेस्टचे प्रेसिडेंट तुषार चित्ते, सचिव प्रविण जाधव, रमण जाजू, डॉ. राजेश पाटील, किरण राणे, सुनिल अग्रवाल, डॉ. सुशिलकुमार राणे, प्रकल्प अध्यक्ष योगेश भोळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की,रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पाहता त्याचा आहारात वापर वाढला पाहिजे.
रानभाज्या, त्यांची माहिती व त्यांचे आहारातील महत्व याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. अनंत पाटील तसेच मु. जे. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे मनोजकुमार चोपडा यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सरिता खाचणे व कावेरी राजपूत यांनी केले.उमेश पाटील व सहकाऱ्यांनी लिहीलेल्या रानभाज्या या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवा
१ आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
२ कोरोनाच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे. रानभाज्यांचाही प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये मोठा वाटा असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
चांगला प्रतिसाद
या रानभाजी महोत्सवाला शेतकरी अन् ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ५०हून अधिक शेतकºयांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल यावेळी लावले होते. ग्राहकांनीही या रानभाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सुरक्षित अंतर पाळून ग्राहकांनी खरेदी केली. अनेक रानभाज्या बाजारपेठेतही उपलब्ध होत नाही, त्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहकांनीही खरेदीचा आनंद लुटला.
रानभाज्या हातोहात संपल्या
रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत रानभाज्यांचा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील सर्व रानभाज्या दुपारी १ वाजताच संपून गेल्या.विशेष म्हणजे या रानभाज्या कशा बनवायच्या याची कृतीही काही शेतकºयांनी स्टॉलवर लावली होती.