मनात उत्साही विचार जागवा - शिवानी दीदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:10 PM2020-03-08T12:10:53+5:302020-03-08T12:12:14+5:30
संकल्पाच्या शक्तीने सकारात्मक वातावरणाची निर्मिती शक्य
आपल्यातील नकारार्थीपणा काढून टाकणे, उत्साही विचार करायला हवा, यासाठी प्रत्येकाने आपल्यात असलेली शक्ती, गुणाकडे लक्ष पुरवावे. बिझी या शब्दामुळे आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी होते, त्यामुळे ‘बिझी’ हा शब्दच काढून टाका, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी शिवानी दिदी यांनी केले आहे. शिवानी दिदी सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत, त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ताण- तणाव घालविण्यासाठी उपाययोजनाही सांगितल्या.
प्रश्न : आपण नेहमी सांगतात.. स्वत:ला ओळखा म्हणजे नेमके काय?
उत्तर : आपण आपल्यातील क्षमता, कमी, कमजोरी ओळखणे आणि त्या उदारपणे स्वीकारणे ही फार मोठी गोष्ट आहे. मी मोठा, माझ्यात काही कमी नाही किंवा मला गुणदोषासहीत स्वत: ला स्विकारणे महत्वाचे असते. खरंतर आपण स्वत:ला स्वीकारत नाही, आपल्यात काय क्षमता आहेत हे आपणासही ज्ञात नसते. परमेश्वराने आपणाला गुण, शक्ती दिलेल्या आहेत, मात्र आपण त्याकडे लक्षच देत नाहीत.
प्रश्न : मग माणसामधील ‘स्व’त्व हे कसं वाढतं?
उत्तर : आपणास कुणी दुसरे म्हणते की तुमच्यात हे कमी आहे तेव्हा आपणास त्याचा राग येतो कारण आपण मनाने त्या स्विकारलेल्या नसतात. जर आपण अगोदरच्या त्या स्विकारल्यात तर त्यात बदल करुन अर्थात कमजोरी दूर कण्यासाठी जाणवीपूर्वक प्रयत्न आपण करु. अर्थात त्या स्विकारुन त्या दूर केल्यास आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. मी जो काही आहे गुणदोषा सकट मला मान्य आहे आणि जसे माझ्यात गुण आहेत तसेच दुगूर्ण, कमी सुद्धा असेल आणि ती मी दूर केली पाहिजे.
प्रश्न : आपण बिझी आहोत, असं कधीच समजायचं नाही, पण त्यामुळे नेमकं काय होतं?
उत्तर : आपण असं बोलण्यामुळे आपल्यात सकारात्मक विचार तयार होतात. आपली तब्येत बिघडली तरी आपण म्हणावं की, माझी तब्येत चांगली आहे. हा संकल्प, हा विचार आपल्यात औषधाचं काम करतो. जे दिसतंय, त्याचा विचार नाही करायचा, जे दिसत नाही त्याचा विचार करावा.
प्रश्न : पण सकारात्मक विचार केल्याने आपल्यात बदल होतो हे खरं आहे?
उत्तर : संकल्पात एक शक्ती असते. कुणीही हा प्रयोग करावा. संकल्पाच्या शक्तीने आपण सकारात्मक वातावरण बनवू शकतो. विचाराने जीवनपद्धती बदलते. त्याचा आरोग्य, नातेसंबंध, प्रकृतीवरही परिणाम जाणवतो.
सध्या खूप धावपळीचे जग आहे. तणाव वाढत आहे..यावर उपाय सांगता येतील?
आपल्या शब्दकोशात ‘बिझी’ हा शब्दप्रयोग तर नाही ना, हे पाहिले पाहिजे. या शब्दामुळे आपण आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी करतो. कधीपण असे म्हणू नका की मी व्यस्त आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे असा विचार करा आणि तसेच बोला. जेवढे माझ्याकडे काम आहे, त्यापेक्षा खूप जास्त माझ्याकडे वेळ आहे. वेळेचा सन्मान करा.त्यामुळेच वेळेबरोबर आपलं एक छान नातं तयार होईल. आपला परिवार आणि प्रकृतीसाठी आपण वेळ काढला पाहिजे.
शिवानीदीदी ह्या पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रानिक्स इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलीस्ट आहेत. २० पेक्षा अधिक वर्षे त्यांनी राजयोग मेडिटेशनमध्ये अभ्यास केला आहे. अध्यात्म हे आपल्या जीवनशैलीला जोडलेले असावे, यासाठी त्या प्रचार आणि प्रचार करीत असतात.
माझी तब्येत चांगली आहे, हा संकल्प. हाच विचार आपल्यात औषधाचे काम करतो. जे दिसतयं त्याचा विचार करायचा नाही... - शिवानी दिदी