खुल्या भूखंडावरची सफाईसाठी जेसीबीची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:32+5:302021-01-08T04:45:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव-शहरातील अनेक भागात असलेल्या खुल्या भुखंडावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यापैकी अनेक भूखंड हे मनपाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव-शहरातील अनेक भागात असलेल्या खुल्या भुखंडावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यापैकी अनेक भूखंड हे मनपाच्या मालकीचे आहेत. याठिकाणचा कचरा नियमितपणे उचलला जात नसून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रभाग समितीच्या माध्यमातून या खुल्या जागांची साफसफाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक समितीला स्वतंत्र जेसीबीची व्यवस्था करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी उपमहापौर सुनील खडके यांनी आयुक्तांकडे पत्राव्दारे केली आहे.
शहराच्या सर्वच भागात महापालिकेच्या व खासगी मालकीच्या खुल्या जागांची स्थिती अत्यंत बिकट आहे. नागरीकांकडून कचरा कुंडीसारखा त्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांना आरोग्याचा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपमहापौरांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरात सुमारे २० हजार खुल्या जागा असून यात मनपाच्या व खासगी प्लॉटचा देखील समावेश आहे. या मालमत्तांचा कोणताही वापर होत नसल्याने त्यात झाडे झुडपे वाढून त्या ठिकाणी कचऱ्याचे आगार झाले आहे. महापालिकेने या खुल्या जागांची साफसफाईची जबाबदारी संबंधित प्रभाग समित्यांवर टाकण्याची सुचना उपमहापौरांनी यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीला स्वतंत्र जेसीबीची व्यवस्था करून द्यावी अशाही सूचना या पत्राव्दारे मनपा आयुक्तांना दिल्या आहेत.
ओपनस्पेस ठरताहेत कचरा संकलन केंद्र
शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण होत असताना, दुसरीकडे अनेक खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकल जात आहे. त्यामुळे खुले प्लॉट आता एक प्रकारे कचरा संकलन केंद्रच झाले आहेत. मनपा प्रशासनाकडे याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, तरीही मनपाकडून या जागांवरील स्वच्छता केली जात नसल्याने मनपाने अशा तक्रारींकडे गांभिर्याने लक्ष देण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.