तलाठी, सासू, नणंद यांनाही अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:26+5:302021-05-23T04:15:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मयूर काॅलनीतील योगिता सोनार यांच्या खून प्रकरणात सासू, नणंद यांना अटक करून सातबारा उताऱ्यात ...

Arrest Talathi, mother-in-law, Nanand too, otherwise the body will not be taken into custody ... | तलाठी, सासू, नणंद यांनाही अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही...

तलाठी, सासू, नणंद यांनाही अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मयूर काॅलनीतील योगिता सोनार यांच्या खून प्रकरणात सासू, नणंद यांना अटक करून सातबारा उताऱ्यात परस्पर नाव टाकणाऱ्या पिंप्राळा तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक करावी या मागणीसाठी नातेवाईक शनिवारी आक्रमक झाले. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. तीन तासांच्या गोंधळानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

पिंप्राळा येथील मयूर कॉलनीत योगिता सोनार यांचा शुक्रवारी रात्री दीर दीपक याने मालमत्तेच्या वादातून खून केला. शनिवारी मयत योगिता यांची औरंगाबाद येथील काकू पूनम वडनेरे तसेच बहीण प्रियंका रणधीर व इतर नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला.

तलाठीसुद्धा तेवढेच गुन्हेगार...

मालमत्तेच्या वादातून योगिता हिचा दिराने खून केला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तिला सासू, नणंद व भाचा हे त्रास देत होते, असा आरोप मयताची काकू पूनम वडनेरे व नातेवाइकांनी केला. मुलगा सुनेला कुऱ्हाडीने मारत असताना, सासूने फक्त बघ्याची भूमिका का घेतली? जर मुलाला रोखले असते तर योगिता जिवंत राहिली असती. या गुन्ह्यात सहभागी सर्वांना अटक करण्‍यात यावी, अशी मागणी करीत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यात पिंप्राळा तलाठीसुद्धा इतरांप्रमाणे तेवढेच गुन्हेगार आहेत. कुठलाही अर्ज दिलेला नसताना त्यांनी परस्पर सातबारा उताऱ्यावर योगिता, तिचा मुलगा व सासूचे नाव कसे लावले, त्यांना परस्पर नाव लावण्याचा अधिकार कुणी दिला, असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली.

मृतदेह दिला ताब्यात...

पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घातल्यानंतर काही वेळाने गोंधळ शांत झाला. अखेर बारा वाजेच्या सुमारास मयत योगिता यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्‍यात आले. त्यानंतर मृतदेह हा नातेवाइकांच्या ताब्यात देण्‍यात आला. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले.

मुलाने कथन केली आपबिती

दोन महिन्यांपासून आईला अपघाती विमा काढ असे सांगत होते. आत्या व काकाने आमचे दोन्ही मोबाइल हॅक केले. तीन दिवसांपूर्वी काका दीपक यांनी सांगितले की, दहा महिन्यांपासून सगळे सहन केलेले आहे. आता सगळे संपून जाईल. त्यांनी आईशी भांडण करून तिच्या डोक्यात कुऱ्हाड मारली, अशी माहिती मयत योगिता यांचा मुलगा आर्यन याने रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

चार दिवसांची पोलीस कोठडी

योगिता सोनार यांच्या खूनप्रकरणी शनिवारी दीर दीपक लोटन सोनार याला शनिवारी रामानंदनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी सुनावणीअंती त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिवधाम मंदिर परिसरात प्लॉट

मयूर कॉलनीतील घर व शिवधाम मंदिर परिसरात प्लॉट हे योगिता यांचे पती मुकेश सोनार यांच्या मालकीचे आहे. याच्यावर परस्पर योगिता, त्यांचा मुलगा व सासू प्रमिला यांचे नाव लावण्यात आले. योगिता यांनी कुठलेही अर्ज दिलेले नव्हते. मग, दीर दीपक याने पिंप्राळा तलाठ्याच्या मदतीने हे सर्व केले, असा आरोप त्यांनी केला.

रात्रीच मुलाने दिली फिर्याद

शुक्रवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास दीपकने मालमत्तेचे कागदपत्र पेटीतून काढून लाकडी टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवत होते. हा प्रकार योगिता यांच्या लक्षात येताच, त्यांनी दीपक याला विचारणा केली. त्यावर दीपक याने आर्यन याला तुझ्या आईला मागच्या खोलीत जा असे सांगितले. यानंतर वाद होऊन दीपक याने घरातील कुऱ्हाड काढून योगिता यांच्या डोक्यात मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आईला दुखापत झाल्याचे पाहताच, आर्यने काका दीपक याच्या हातातील कुऱ्हाड हिसकवली व ती बाजूला फेकली. काका दीपक हा त्याच्याजवळ आला व बाळ आता सर्व संपले असा म्हणाला. आर्यन याने १०० क्रमांकावर पोलिसांना व त्यानंतर मावशी प्रियंका, आत्या सुदर्शना व पूनम यांना फोन करून संपूर्ण घटना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Arrest Talathi, mother-in-law, Nanand too, otherwise the body will not be taken into custody ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.