क्रिकेटवर आॅनलाईन सट्टा घेणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:03 PM2019-01-09T13:03:36+5:302019-01-09T13:05:33+5:30
मोबाईल दुकानात पकडले
जळगाव : क्रिकेटवर बेटींग आॅनलाईन सट्टा घेणाºया भावेश पंजुमल मंधान (वय ३०, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) याला अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गोलाणी मार्केटमध्ये रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला मुंबई जुगार अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोलाणी मार्केटमध्ये सोना मोबाईल शॉपी या दुकानात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट व अन्य खेळांवर आॅनलाईन बेंटींग केली जात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील सुनील दामोदरे, विजय सोनवणे, अजय पाटील व रफिक शेख यांच्या पथकाला खात्री करण्यासाठी पाठविले होते. त्यानुसार या पथकाने डी विंग मधील सोना मोबाईलवर धाड टाकली असता भावेश हा आॅनलाईन सट्टा घेत होता. राजेशभाई व जितू भाई या दोन जणांकडून तो सट्टा घेत असल्याचे निष्पन्न झाले. मतानी यांनी सायंकाळी स्वत: येवून चौकशी केली.
दोन दिवस पाळत ठेवून पथकाची कारवाई
पथकाने दोन दिवस संबंधित प्रकाराबाबत खात्री करण्यासाठी पाळत ठेवली. क्रिकेट बेटींग होत असल्याची खात्री झाल्यावर पथकाने भावेश याला ताब्यात घेतले. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात आणत असताना संशयितान्गोंधळ घातला व बेटींग करत असलेले मोबाईल पोलिसाकडून लपविण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडील दोन मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहे.