दर्ग्यातील दानपेटी चोरणाऱ्यास पिंप्राळ्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 12:41 PM2020-05-09T12:41:08+5:302020-05-09T12:41:23+5:30
जळगाव : चार दिवसांपूर्वी खाँजामिय्या दर्ग्यामधील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दिनेश ताराचंद चव्हाण (रा़ ...
जळगाव : चार दिवसांपूर्वी खाँजामिय्या दर्ग्यामधील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दिनेश ताराचंद चव्हाण (रा़ मढी चौक, पिंप्राळा) यास पिंप्राळ्यातून अटक केली असून त्याच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील खाँजामिय्या दर्ग्यातून अज्ञात चोरट्याने चार दिवसांपूर्वी दानपेटी चोरून नेली होती़
सकाळी स्वच्छता करण्यासाठी आलेल्या भाविकांना चोरीचा प्रकार कळताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती़ त्याचबरोबर दर्गा पसिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटा दिसून आला होता़ ते फुटेज पोलिसांना देण्यात आले होते़
जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील डिबी कर्मचारी नाना तायडे यांनी तपास करीत दिनेश चव्हाण नामक तरुणाने चोरी केल्याची माहिती समोर आली़
कोळश्याच्या पोत्यात लपविली दानपेटी
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नाना तायडे, प्रशांत जाधव, हेमंत तायडे, अविनाश देवरे, शिवाजी धुमाळ, उमेश पाटील यांनी संशयिताच शोध घेण्यास सुरुवात केली़ अखेर पिंप्राळ्यातील मढी चौकात संशयित चोरटा दिनेश हा राहत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नाना तायडे यांना मिळाली़ त्यानुसार लागलीच शुक्रवारी त्यास राहत्या घरून अटक करण्यात आली़ त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे़ तर चोरी केलेली दानपेटी ही कोळश्याच्या पोत्यात लपवून ठेवलेली असल्याने ती पोलिसांना काढून दिली़ सुमारे १४ हजार रुपयांचा रोकड त्या असल्याची समोर आले़