ढोल-ताश्यांच्या गजरात शिवरायांच्या पुतळ्याचे चाळीसगावी आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:48+5:302021-09-27T04:18:48+5:30
चाळीसगाव : तुतारींची गगनभेदी गर्जना... रस्त्यांच्या दुतर्फा शिवबांच्या पुतळ्यासमोर हात जोडत अभिवादन करणारा जनसागर... रांगोळ्यांची देखणी आरास... बेल-भंडाऱ्यासह गुलालाची ...
चाळीसगाव : तुतारींची गगनभेदी गर्जना... रस्त्यांच्या दुतर्फा शिवबांच्या पुतळ्यासमोर हात जोडत अभिवादन करणारा जनसागर... रांगोळ्यांची देखणी आरास... बेल-भंडाऱ्यासह गुलालाची उधळण... नभातून बरसणाऱ्या जलधारांचा जलाभिषेक आणि हजारो मुखांतून निनादणारा ‘जय शिवराय’चा गजर... अशा अपूर्व जल्लोषात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता येथील सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन झाले. पुतळा चबुतऱ्यावर बसविताना उपस्थित हजारो नागरिकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत शिवरायांना मानाचा मुजरा केला.
सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारला जावा. यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर रविवारी पुतळ्याचे पिलखोडपासून वाजत-गाजत हर्षोल्हासात येथे आगमन झाले.
चौकट
साडेअकरा तास शिवरायांचा जयघोष करत सकाळी नऊ वाजता पिलखोडपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील व सर्व नगरसेवकांसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
1...मिरवणुकीला पिलखोडपासून सुरुवात झाल्यानंतर या मार्गावर असणाऱ्या टाकळी प्र.दे., आडगाव, देवळी, भोरस, बिलाखेड येथेही ग्रामस्थांनी स्वागत करीत अभिवादन केले.
2...मिरवणुकीच्या अग्रभागी ढोल-ताश्यांच्या पथकांसह वाद्याचा दणदणाटही होता. यावेळी ऐतिहासिक मैदानी खेळ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. ही मिरवणूक अखंडपणे साडेअकरा तास चालली. .....
चौकट
आमदार - खासदारही थिरकले
मिरवणूक टाकळी प्र.दे. येथे पोहोचल्यानंतर या जल्लोषात खासदार पाटील व आमदार चव्हाण या दोघांनी ठेका धरला.
वातावरणाला भगवा नूर
संपूर्ण शहरात विद्युत रोषणाईसह भगव्या कमानींची सजावट करण्यात आली होती. सर्वदूर दिसणारे भगवे ध्वज लक्ष वेधून घेत होते. सायंकाळनंतर सिग्नल चौकात हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.