आर्टिकल - पुन्हा ‘वाचन संस्कार’ कोरोनाने रुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:26+5:302020-12-12T04:33:26+5:30

अनेक पुस्तकमित्रांनी आपल्या घरातील पुस्तकसंग्रहातून आवडती पुस्तके पुन्हा वाचलीत, बाहेर वाचनालय बंद असल्याने मित्र-मैत्रिणी व नातेवाईक यांच्याकडून पुस्तके आणून ...

Article - Corona re-rooted 'reading culture' | आर्टिकल - पुन्हा ‘वाचन संस्कार’ कोरोनाने रुजविला

आर्टिकल - पुन्हा ‘वाचन संस्कार’ कोरोनाने रुजविला

Next

अनेक पुस्तकमित्रांनी आपल्या घरातील पुस्तकसंग्रहातून आवडती पुस्तके पुन्हा वाचलीत, बाहेर वाचनालय बंद असल्याने मित्र-मैत्रिणी व नातेवाईक यांच्याकडून पुस्तके आणून आपली राहिलेली पुस्तके वाचून घेतली. कोरोनाने स्वत:ची काळजी घेणे तर शिकविलेच, पण स्वत:साठी वेळ द्यायला आणि स्वत:च्या आवडीकडे पुन्हा वळण्यासही शिकवले. धावपळीच्या जीवनात ठरवून देखील वाचनाला वेळ देता येत नव्हता़ तो वेळ कोरोनाकाळात खूप मिळाला. मात्र, त्यात वाचनाचे स्वरूप मात्र काहीसे बदलले. इंटरनेटच्या युगात ऑनलाईन वाचन, ई-बुकची क्रेझ वाढली.

हल्ली तरुण वर्गाला पुस्तक कॅरी करणे तसेही अवजड होते़ त्यामुळे ही पिढी पीडीएफच्या सुविधा उपयोगी करून हवी ती पुस्तके डाऊनलोड करून घेऊन जमेल तेव्हा हातात मोबाईलमधील पुस्तके वाचू लागली. घरात कंटाळलेल्या शालेय मुलांना रोज नवा बैठे खेळ देऊनही वेळ उरत असल्याने ई-बुकमधील बालसाहित्य वाचनाची आपल्या पाल्यांना वाचनाची आधुनिक सवय पालकांनी लावली आणि तसेही आता गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाईनच अभ्यास करत असल्याने रुजवलेले ऑनलाईन वाचन पुढे वृद्धिंगत सहज झाले. काहीअंशी वाचन प्रकारही जरूर बदलला. साहित्य वाचनासाठी मोठी पुस्तकेच वाचली जावीत, ही परंपरा मोजकी वाचन आवड असलेल्या व्यक्तींनी मोडीत काढली.

सध्या सोशल मीडियावर प्रबोधन, माहिती, विचार, सारांश यावर अनेक साहित्य लेखन संक्षिप्त उपलब्ध असल्याने या वर्गाने तिकडे मोर्चा वळवला. काहींनी यातूनच प्रेरणा घेऊन लघुकाव्य, लघुलेख लिहिण्याची सुरुवातही केली. परिस्थिती भांबावलेली असल्याने स्वत:च्या आरोग्याची काळजी आणि देशाची स्थिती यासाठी वृत्तपत्र वाचनही कोरोनाकाळात नक्कीच वाढले़ काही वृत्तपत्रे ऑनलाईन लिंकवरूनही वाचली गेली़ त्यामुळे स्वरूप बदलले असले तरी विरंगुळा म्हणून का असेना वाचन प्रक्रिया सुरूच राहिली आणि ‘वाचाल तर वाचाल’ ही संस्कृती कोरोना काळात टिकून राहिली. इतर छंद काळाच्या प्रवाहात धावत्या जीवनशैलीत पुन्हा कदाचित मागे पडतील. पण, वाचन हा संस्कार एकदा रुजवला की तो कायम सोबत राहील, हा विश्वास कोरोनाकाळात नक्कीच वाढला.

- वैशाली पाटील, जळगाव

Web Title: Article - Corona re-rooted 'reading culture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.