आर्टीकल - घरातील शाळेला करूया समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:37+5:302020-12-12T04:33:37+5:30

प्रत्येकाच्या क्षमता व आवडीनुसार ऑनलाईन प्रगती करता येऊ शकते आहे. विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येत आहेत. ऑफलाईनच्या तुलनेने ...

Article - Let's enrich home school | आर्टीकल - घरातील शाळेला करूया समृद्ध

आर्टीकल - घरातील शाळेला करूया समृद्ध

googlenewsNext

प्रत्येकाच्या क्षमता व आवडीनुसार ऑनलाईन प्रगती करता येऊ शकते आहे. विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येत आहेत. ऑफलाईनच्या तुलनेने घरबसल्या स्वस्त माहिती उपलब्ध होऊ शकते. कमी वेळात व कमी श्रमात माहिती ऑनलाईन उपलब्ध होत असून ऑनलाईन साक्षरता व तंत्रज्ञानाशी जवळीक साधता येत आहे. ज्ञानाचे खूप मोठे भांडार ऑनलाईन शिक्षणाने उघडले असून ज्ञानाचे आदान-प्रदान करणे सोपे जात आहे. ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याने मनोरंजनातून शिक्षण आणि दृकश्राव्य साधनांचा वापर करून शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेतले जात आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे पाहिल्यानंतर त्याच्या मर्यादा अथवा तोटे सुद्धा लक्षात घ्यावे लागतील. शहरी भागात ऑनलाईन शिक्षण सुरू असताना ग्रामीण भागात मात्र उपकरणांचा अभाव असल्याने पूर्णतः ऑनलाईन शक्य होत नाही.

प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल यासाठी सरकारने देखील विविधांगी पावले उचलली आहेत. जूनच्या सुरुवातीला प्रत्येक वर्गाची पाठ्यपुस्तके घरपोच पोचविण्यात आली. दीक्षा ॲप, युट्युब, टिलीमिली, सह्याद्री वाहिनी, जिओ टिव्ही यांच्या माध्यमातून शिक्षण संवाद सुरू झाला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यघटकातील सुमारे पंचवीस टक्के पाठ्यघटक कपात करण्यात आले आहेत. शिक्षक, शाळा, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षण पद्धती कशा पद्धतीने राबवता येईल याचा देखील विचार शालेय शिक्षण विभागामार्फत केला जात आहे.

ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणात पालकांची भूमिका देखील महत्वपूर्ण आहे. त्याकरिता प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची पाठ्यपुस्तके हाताळली पाहिजे. पाठ्यपुस्तकांच्या सुरुवातीला असलेल्या अध्ययन निष्पत्ती किमान एकदा वाचाव्यात. पाल्याच्या शिक्षणाविषयी सकारात्मकता बाळगावी. मुलांशी संवाद साधून चर्चा करावी. पाल्याच्या अध्ययनासाठी सहकार्य करावे. शाळा व शिक्षकांकडून आलेला अभ्यास व मुलांची सांगड कशी घालता येईल याकडे लक्ष द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्क्रीन टाईम ठरवावा. दिवसातून किती वेळ टीव्ही आणि मोबाईल मुलांना दिला पाहिजे याकडे बारकाईने लक्ष द्यावे. ज्यादा क्लासेसची सक्ती अजिबात करू नये आणि सर्वात महत्वाचे मानसिक स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवावे. कारण गेल्या नऊ महिन्यांपासून आपली मुले घरातच असल्याने मानसिक स्वास्थ्य सांभाळणे खूप महत्त्वाचे झाले आहे.

शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. हा विद्यार्थी गेल्या नऊ महिन्यांपासून घरात असल्याने त्याची नेमकी भूमिका काय यावरही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन कमी आणि ऑफलाईन जास्त अभ्यास कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. यासाठी वाचन व लेखनावर भर द्यावा. प्रश्नोत्तरांपेक्षा पाठ व कवितांच्या आकलनावर भर द्यावा. न समजलेल्या घटकांविषयी पालक व शिक्षकांशी संवाद साधावा. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव द्यावा. घरी असल्यामुळे आई-वडिलांच्या कामात मदत करावी आणि सर्वात महत्वाचे आपल्या स्वभावात चिडचिड न आणता मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नये.

अशा पद्धतीने शिक्षणक्षेत्रात झालेला हा खूप मोठा बदल स्वीकारणे शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा, अधिकारी, शासन-प्रशासन यांनी स्वीकारणे गरजेचे झाले आहे. झालेला हा बदल स्विकारला आणि समजून घेतले की सारे काही सोपे होऊ शकणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात आलेली ही शाळा समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने यात सहभाग नोंदविणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर मग, झालेला बदल स्वीकारूया आणि आपल्या प्रत्येकाच्या घरातील शाळेला समृद्ध करूया.

- डॉ. जगदीश पाटील, (मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती, पुणे)

Web Title: Article - Let's enrich home school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.