जळगावात तयार झाले गुडघ्यावरील कृत्रिम आवरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:20 PM2019-07-14T12:20:07+5:302019-07-14T12:20:39+5:30
रावेर तालुक्यातील तरुणीवर देशातील सातवी शस्त्रक्रिया
विजयकुमार सैतवाल
जळगाव : गुडघ्याची झिज होण्यासह त्यावरील आवरणास अथवा वाटीला काही इजा झाल्यास गुडघे बदल करणे हा एकमेव पर्याय असताना जळगावात नवीन संशोधनाचा अवलंब करीत गुडघ्यावरील कृत्रिम आवरण यशस्वीरित्या तयार करण्यात आले. विशेष म्हणजे चालू-फिरु शकत नसलेल्या तरुणीच्या गुडघ्यावर हे आवरण टाकण्यात आल्याने ही तरुणी आज व्यवस्थित चालण्यासह तिचा पायही वाकू लागला आहे. जळगावात झालेली ही देशातील सातवीच शस्त्रक्रिया असून या निमित्ताने जळगावातील वैद्यकीय क्षेत्राने देशात पुन्हा एकदा आपले नाव देशभरात पोहचविले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन मानवाला वरदान ठरत आहे. यात ह्रदय बदल करणेही या क्षेत्राने शक्य करून दाखविले आहे. असे असले तरी काही छोट्या-छोट्या वेदनांमुळे अनेक जण त्रस्त असतात. अशाच प्रकारे वयोमानानुसार गुडघे दुखी, त्यांची झीज होणे आणि आता तरुण वयातही चालता-फिरताना अथवा शेतात काम करताना पाय मुरगळ््यास त्यामुळे होणाऱ्या दुखापतींचे (स्पोर्ट इन्ज्युरी) प्रमाण वाढत आहे. यात पूर्वी थेट गुडघे बदल करावे लागत असे. कालांतराने यात बदल होत जाऊन गुडघ्याचा जेवढा भाग खराब झाला तेवढाच बदलविण्याचे संशोधन पुढे आले व त्यामुळे गुडघे दुखापतग्रस्तांना बराच दिलासा मिळाला. हे संशोधन झाले तरी गुडघ्यावरील कृत्रिम आवरण तयार करणे मात्र शक्य झालेले नाही. त्यामुळे आता देशात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत रुग्णाच्या अस्थिमज्जातून (बोनमॅरो) स्टेमसेल काढून त्यापासून गुडघ्यावरील आवरण तयार केले जात आहे. देशात सहा ठिकाणी अशा प्रकारचे आवरण तयार करण्यात येऊन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या पाठोपाठ आता जळगावातही अशाच प्रकारे कृत्रिम आवरण तयार करण्यात येऊन एका तरुणीला पुन्हा चालते-फिरते केले आहे.
तीन महिन्यात तरुणी चालू लागली
रावेर तालुक्यातील एक तरुणी घरातच अचानक पडली व तिच्या गुडघ्यातील आवरणाचा तुकडाच पडला. त्यामुळे तिला पाय वाकविताही येत नव्हता की चालता येत नव्हते. यामुळे तिचे महाविद्यालयात जाणेही अवघड झाले. त्यानंतर जळगावात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. केवळ अठराव्या वर्षी गुडघा बदलणे शक्य नसल्याने आवरणाचा तुकडा पडलेल्या जागी पुन्हा दुसरे आवरण लावणेच योग्य ठरणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार तरुणीच्या अस्थिमज्जातून स्टेमसेल काढण्यात आले व विदेशातून काही वस्तू मागवून जळगावात कृत्रिम आवरण तयार करण्यात येऊन त ेतिच्या गुडघ्यातील आवरणाच्या तुटलेल्या जागी टाकण्यात आले. त्यामुळे तीन महिन्यातच ही तरुणी पुन्हा व्यवस्थित चालत असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
गुडघ्यातील आवरण तयार करणे आतापर्यंत शक्य झालेले नाही. मात्र आता नवीन संशोधनानुसार रुग्णाच्या बोनमॅरोमधून स्टेमसेल काढून हे आवरण तयार केले जात आहे. देशात आतापर्यंत सात ठिकाणी अशा प्रकारचे आवरण तयार करण्यात येऊन शस्त्रक्रिया केल्या गेल्या. आता जळगावातही अशाप्रकारचे आवरण तयार केले. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक अविष्कार आहे.
- डॉ. मनीष चौधरी, सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ.