जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई : एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:16 PM2018-05-23T22:16:04+5:302018-05-23T22:16:04+5:30
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२३ : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. मात्र या प्रकरणी जिल्हा प्रशासन गंभीर नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा गावात पाण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने गावातील निम्मे कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. निमखेड गावातील पाणी टंचाई संदर्भात १४ मार्च रोजी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ लाख २२ हजारांचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यामध्ये त्रुटी काढून हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला. त्यानंतर जि.प.सीईओ यांनी आपल्याला पाच लाखांपर्यंतच्या मंजुरीचे अधिकार असल्याची त्रुटी काढली. त्यानंतर नव्याने तीन लाखांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर काल हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. एका प्रस्तावासाठी फाईल मंजुरीचा तीन महिन्यांचा प्रवास होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना करण्यात आली याबाबत आपण माहिती मागविली असून त्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहोत. उन्हाळ्याची स्थिती असताना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत किती आणि कोठे कामे सुरु आहे असा सवाल त्यांनी केला. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी जळगाव जिल्ह्यातील विकासात शिथीलता आल्याचे त्यांनी सांगितले.