कलावंतांने शोधक असावे, मन तंदुरूस्त ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:17 AM2021-07-30T04:17:25+5:302021-07-30T04:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नाटक ही सोपी व साधारण गोष्ट नसून ती अतिशय गंभीर होऊन करायची कला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नाटक ही सोपी व साधारण गोष्ट नसून ती अतिशय गंभीर होऊन करायची कला आहे. त्यासाठी कलावंताने नेहमी शोधक असावे, तंदुरूस्त असावे, शरीर तंदुरूस्त असेल तरच मन ही उत्तम राहील, असे विचार जेष्ठ नाटककार व दिग्दर्शक अतुल पेठे यांनी मांडले. परिवर्तन आयोजित दोन दिवसीय रंगसंगत नाट्य शिबीरात ते बोलत होते.
उद्घाटन जळगावचे रंगकर्मी अनंत उर्फ बंटी जोशी, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी यांच्या हस्ते घंटानाद करून झाले. याप्रसंगी परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, वसंत गायकवाड, शिबीर प्रमुख नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत सिने अभिनेता व नाटककार ओंकार गोवर्धन यांनीही मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी डॉ.अमित पवार यांनी मांडणी केली. या दोन दिवसात भाषे विषयी, नाटक समजून घेणे, काय वाचावे, पहावे, आवाजाविषयी, स्वतःचा शोध घेणे या सारख्या अनेक विषयांवर चर्चा व प्रात्याक्षिके शिबिरार्थींकडून करून घेण्यात आली. शिबिरात १६० अर्जांपैकी २० विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली होती. यात जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर व यावल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी होरिलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, सुनील बारी, राहुल निंबाळकर, अभिजीत पाटील यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी रंगकर्मी व शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे यांनी सहकार्य केले.