बिलं वाटप झालेल्या गाळेधारकांना भरावीच लागेल थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:14 AM2019-05-19T01:14:02+5:302019-05-19T01:14:31+5:30
‘लोकमत’भेटी दरम्यान मनपा आयुक्तांची माहिती
जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मार्च २०१९ पर्यंत थकीत भाडे भरण्यासाठी देण्यात आलेल्या बिलांची रक्कम मनपाकडे भरावीच लागणार आहे. बिलांच्या रक्कमेत कोणतीही घट करणे शक्यच नसून गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ च्या शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी मनपासमोर असलेल्या अडचणी व त्या अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आपल्या कार्यकाळात मनपातील सर्व रिक्त असलेल्या शासकीय पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, मनपात चांगल्या अधिकाºयांची टीम तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या भेटीप्रसंगी देत शहर विकासवर आपला भर राहणार असल्याची ग्वाही दिली
आर्थिक समस्या हेच मनपासमोर आव्हान
मनपाची सूत्रे सांभाळण्याआधी या ठिकाणच्या आर्थिक समस्येविषयीची माहिती असल्याने कुठलेही व्हिजन घेवून आपण मनपाची सूत्रे हाती घेतली नसल्याची माहिती आयुक्त टेकाळे यांनी दिली. मनपाची आर्थिक परिस्थती बेताची असल्यानेच सर्व समस्या निर्माण झाल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
ही समस्या दूर करण्यासाठी मनपाकडे एकमेव पर्याय मुूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेच असून, आपल्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मलनिस्सारण योजनेचे निविदांचे काम अंतिम टप्प्यात
अमृत अंतर्र्गत मंजूर झालेल्या मलनिस्सारण योजनेच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आचारसंहिता संपल्यानंतर निविदा उघडल्या जाणार असून, लवकरच कार्यादेश देवून हे काम सुरु करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
अमृतचे काम नोव्हेंबरअखेर
तसेच १०० कोटीतील ५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून, या कामांच्या निविदा काढून कामे दोन-तीन महिन्याचा काळात सुरु होणार आहेत.
याशिवाय अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील नोव्हेंबर महिन्यात पूर्णहोणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
नवीन पंप बसविल्यामुळे अनेक भागांमधील पाण्याची समस्या मार्गी लागेल
शहरातील अनेक उंच भागात पाणी पोहचत नसल्याचा अनेक तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत. वाघूर पंपीगजवळ असलेले दोन पंप हे जुने झाल्यामुळे धरणातून पाण्याची उचल चांगल्या पध्दतीने होत नव्हती. त्यामुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र, बुधवारीच वाघूर पंपीग स्टेशनवर दोन नवे पंप बसविल्यामुळे पाण्याची उचल ही ९० ते ९५ टक्के होणार असल्याने ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्या भागात देखील जास्त दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.