अरुण दाते यांच्या भावगीतांची जळगावकरांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:33 PM2018-05-07T12:33:32+5:302018-05-07T12:33:32+5:30
‘शुक्रतारा’ने जिंकली होती मने
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ७ - ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाने जळगावातीलही संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून भावगीतांचा शुक्रतारा निखळल्याची भावना व्यक्त झाल्या. अरुण दाते हे जळगावात तीन वेळा ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमानिमित्त येऊन गेले असून त्यांच्या भावगीतांनी जळगावकरांना भूरळ घातली आणि त्या आठवणी आजही ताज्या आहेत.
अरुण दाते यांच्या निधनाचे वृत्त जळगावात पोहचताच संगीतप्रेमी हळहळले. सोशल मीडियावर श्रद्धांजलीचे विविध संदेश फिरू लागले. या सोबतच संगीतप्रेमींनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
स्थानिक कलावंतांना दिली संधी
१९९४मध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हवाहव्याशा वाटणाऱ्या शुक्रतारा या कार्यक्रमाचे जळगाव येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात वरद नाट्य प्रभा या संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी शुक्रतारा मधील ‘शुक्रतारा मंद वारा...’, ‘या जन्मावर या जगण्यावर...’, ‘अशी पाखरे येती...’ या गीतांसह ‘येशील येशील राणी साखर शिंपडत येशील...’ यासह विविध गीतांनी जळगावकरांना मंत्रमुग्ध केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अरुण दाते यांनी स्थानिक कलावंतांना संंधी दिली होती, अशा आठवणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे शिक्षक तथा वरद नाट्य प्रभा या संस्थेचे सुनील कानडे यांनी सांगितल्या. विशेष म्हणजे कानडे यांचा मुलगा अबोल हा अरुण दाते यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि तेव्हापासून तो आजही अरुण दाते यांचे गीत सादर करतो.
खान्देशी पाटोड्याच्या भाजीचा आस्वाद
अरुण दाते ज्या वेळी जळगावात यायचे त्या वेळी ते खान्देशी पाटोड्याची भाजीचा आस्वाद घ्यायचे. त्याचा आवर्जून उल्लेखही ते करायचे.
‘अविरत होती यावे नाम...’ सादर व्हायचे आणि.......
जिल्हा बँकेच्या सभागृहासह बालगंधर्व खुल्या नाट्यगृहातही अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांच्यासोबत सह गायिका म्हणून सुवर्णा माटेगावकर, सरिता भावे यादेखील जळगावात आल्या. या वेळी गंमत म्हणून सांगताना अरुण दाते म्हणाले, सुवर्णा माटेगावकर यांनी लावणी सादर करण्याची प्रेक्षकांची मागणी यायची आणि त्यांनी लावणी सादर केली की मी काय सादर करावे, असा नेहमी प्रश्न पडायचा. त्या वेळी मी ‘अविरत होती यावे नाम, श्रीराम जय राम जयजय राम’ हा अभंग सादर करायचो आणि सर्व वातावरण निवळून जायचे आणि मी माझे गीत सादर करायचो, असे ते नेहमी सांगत असत, अशी आठवण गायक प्रमोद जोशी यांनी सांगितली.
चांदोरकर प्रतिष्ठानच्या कार्याची स्तुती
अरुण दाते यांनी २८ आॅक्टोबर २००१ रोजी दीपक चांदोरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन वसंतराव चांदोरकर यांच्या नावाने प्रतिष्ठान सुरू करून उदयोन्मुख कलावंताना संधी देत असल्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले व तसा अभिप्रायदेखील त्यांनी लिहिला. या वेळी त्यांनी विविध आठवणी जागविल्या, अशी आठवण दीपक चांदोरकर यांनी सांगितली.
साथसंगत करण्याची संधी मिळाली
अरुण दाते यांच्या जळगावात झालेल्या कार्यक्रमात मला साथसंगत करण्याची संधी मिळाली हा अविस्मरणीय क्षण होता. ते कलावंताची कदर करणारे व गुणांची पारख करणारे व्यक्तीमत्व होते, अशी आठवण गिरीश मोघे यांनी सांगितली.