शिवसेना कमकुवत झाल्याने राज्यात भाजपला मोठी संधी - एकनाथ खडसे
By विलास.बारी | Published: October 10, 2022 04:56 PM2022-10-10T16:56:50+5:302022-10-10T16:57:50+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून शिवसेना उभी केली. तसेच धनुष्यबाण या चिन्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास तात्पुरती मनाई केली आहे.
जळगाव - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भांडणामुळे चिन्ह गमवावे लागले. राज्यात शिवसेना कमकुवत होत असताना भाजपाला पक्षवाढीसाठी मोठी संधी असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी सोमवारी जळगावात व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी जिल्हा कार्यालयात झाली. बैठकीनंतर खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून शिवसेना उभी केली. तसेच धनुष्यबाण या चिन्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास तात्पुरती मनाई केली आहे. शिवसेनेचे दोन तुकडे होणे हे राज्याच्या व वैयक्तिक शिवसेना पक्षाच्या हिताचे नसल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाला राज्यात मजबूत होण्याची संधी
उद्धव ठाकरे यांनी काय केले किंवा एकनाथ शिंदे यांनी काय केले हे महत्वाचे नाही. दोघांच्या वादात धनुष्यबाण मोडला गेला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेत दोन गट पडलेले आहे. राज्यात शिवसेना कमकुवत होत आहे. असे असताना राज्यात भाजपला मजबूत होण्याची संधी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पक्षच संपेल अशी चूक घातक
पक्ष चालवित असताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चुका झाल्या असतील. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही चुका झाल्या असतील. मात्र आपला पक्षच संपेल इतकी मोठी चूक ही नसावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
विकासाचे राजकारण पडतय बाजूला
सध्या राज्यात खुन्नसचे राजकारण सुरू असल्याने विकासाचे राजकारण बाजूला पडत आहे. राजकीय पक्षांनी राज्याच्या हितासाठी राजकारणा पलिकडे जाऊन एकत्र येणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.