सरकी व गाठींचे दर वाढताच कापसाच्या दरातही ३०० रुपयांची वाढ मागणी वाढली, आवक मात्र कमी
By Ajay.patil | Published: April 3, 2023 06:28 PM2023-04-03T18:28:01+5:302023-04-03T18:28:15+5:30
कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही आपला माल विक्रीस आणताना दिसून येत नाही.
जळगाव - कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही आपला माल विक्रीस आणताना दिसून येत नाही. आता हळूहळू कापसाची मागणी वाढू लागल्याने कापसाच्या दरात गेल्या तीन ते चार दिवसात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली असून, कापसाचे भाव ७८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. आगामी काळातील दराबाबत कापूस व्यवसायातील जाणकार ठाम नसले, तरी परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदा जिल्ह्यात सुमारे ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी कापूस आहे. मात्र, सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस यायला लागल्यानंतर कापसाच्या दरात सारखी घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणणे कमी केले आहे. एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास कापसाचा हंगाम संपत असतो. मात्र, यंदा ५० टक्केच माल विक्री करण्यात आला आहे.
बाजारात गाठीच नाही...
खान्देशातून सध्यस्थितीत ७ लाख गाठींची खरेदी झाली आहे. अजूनही ४० ते ५० टक्के माल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यातच आता रब्बी हंगाम काढल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण देखील कमी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पुढील हंगामातच माल विक्री करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बाजारात गाठीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात गाठींचे दर वाढले आहेत. गाठींचे ५९ हजार रुपये खंडी असे दर काही दिवसांपुर्वी होते. ते दर आता ६१ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. तर सरकीच्या दरात देखील २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम कापसाच्या भावावर होत असून, कापसाचे दर देखील २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत.
गाठी व सरकीचे दर वाढल्यामुळे कापसाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यात कापसाचे दर कसे राहतील याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. मात्र, कापसाचे दर ७५०० ते ७२०० च्या खाली जाणार नाही हे मात्र निश्चित आहे.
-प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन