पहाटे जळगावात पोहचताच खासगी बसेसवर दंडाची कुऱ्हाड

By विजय.सैतवाल | Published: November 8, 2023 05:51 PM2023-11-08T17:51:41+5:302023-11-08T17:52:01+5:30

नियम मोडणे पडले महागात : २२ बसेसची तपासणी, १० बसेसला एक लाखाचा दंड

As soon as they reach Jalgaon in the morning, fines are imposed on private buses | पहाटे जळगावात पोहचताच खासगी बसेसवर दंडाची कुऱ्हाड

पहाटे जळगावात पोहचताच खासगी बसेसवर दंडाची कुऱ्हाड

जळगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने खासगी बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून २२ खासगी बसेसची बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच जळगावात तपासणी करण्यात आली. यामध्ये नियम मोडणाऱ्या १० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना एक लाख दंड करण्यात आला. 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी बस मालक, चालक मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यासह अतिरिक्त प्रवासी बसवून वाहतूक करीत असतात. तसेच याच काळात या बसेसमधून मालवाहतूक मोठ्या प्रमाणात वाढते. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी तपासणी मोहीम हाती घेतली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी वायुवेग पथक, दोन महसूल सुरक्षा पथक, विशेष तपासणी पथक यांच्यावतीने संयुक्त तपासणी राबविण्यात येऊन आकाशवाणी चौकात पुणे, मुंबई, सुरत येथून आलेल्या २२ बसेचची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या १० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

या बसेसमध्ये अतिरिक्त प्रवासी आढळून येण्यासह मालाची वाहतूक केली जात होती. या सोबतच बसेसच्या कागदपत्रांचीदेखील तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान जादा भाडे आकारणी आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले. 

जादा भाडेविषयी तक्रार करा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी बसेस जादा भाडे आकारणी करीत असल्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करा. सध्या तपासमी मोहीम हाती घेण्यात आली असून बुधवारी २२ बसेसची तपासणी करण्यात आली. यात १० बसेसला दंड करण्यात आला. 
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

Web Title: As soon as they reach Jalgaon in the morning, fines are imposed on private buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.