आशाबाबा नगरातील विवाहितेची आत्महत्या नव्हे, जाळून मारले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:22 PM2020-07-23T12:22:40+5:302020-07-23T12:22:58+5:30
कुटुंबाचा आरोप : आरोपी पती पोलीस असल्याने अभय
जळगाव : आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा मृत्यू जाळून घेतल्याने आत्महत्या भासविली जात असून प्रत्यक्षात तिला जाळून मारण्यात आले असल्याचा आरोप सोनालीचा भाऊ तथा लष्करातील जवान गोविंदा नामदेव चांभार यांनी केला आहे. या गुन्ह्यात सोनालीचा पती नरेंद्र भगवान सोनवणे पोलीस असल्याने त्याचा बचाव केला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत न्याय मिळावा म्हणून गोविंदा यांनी पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
१० जुलै रोजी पहाटे २.३० वाजता सोनाली जळालीचा निरोप नातेवाईकांकडून मिळाला व सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाल्याचा निरोप आला. बाथरुममध्ये जाळून घेतल्याने नातेवाईकांचे म्हणणे आहे, मात्र सोनालीचा पती पोलीस असल्याने त्याने सर्व पुरावे नष्ट केले असून तिला पती व सासरच्यांकडून प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास होता. प्रसुतीचा खर्च देखील माहेरच्यांकडून वसूल केला होता. सतत पैशांची मागणी केली जात होती, अशी तक्रार आहे. या घटनेनंतर ११ जुलै रोजी लष्करातील जवान असलेल्या भावाने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून बहिणीला जाळून मारण्यात आल्याबाबत सासरच्यांविरुध्द तक्रार दिली.
विवाहितेच्या भावाने तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती घेण्यात आली नाही. दोन दिवसांनी पुन्हा तक्रार देण्यासाठी गेले असता तेव्हाही तक्रार घेतली नाही. त्यामुळे सोनालीच्या कुटुंबाने सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. तेव्हा रामानंद नगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश डॉ.रोहन यांनी दिले. त्यानुसार पती नरेंद्र सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. प्रत्यक्षात ही घटना आत्महत्या नसून खूनच असल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक करावी अशी मागणी गोविंदा चांभार यांनी केली आहे.
या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरु आहे, त्यात काही माहिती व पुरावे समोर येतात त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
-अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक