विचार व संस्काराचा वारसा जपताय आशिष गुजराथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:38 PM2018-12-17T15:38:28+5:302018-12-17T15:38:42+5:30
महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत.
संजय सोनवणे
चोपडा : महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत. लहानपणापासून शिक्षण घेण्याच्या विद्यार्थी दशेत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले अरुणभाई गुजराथी यांचे शिक्षण स्कॉलरशिपवर झाले. चिकाटी आणि मेहनत हा स्वभावगुण अरुणभाई यांच्या अंगी आहे.
बी.कॉम. आॅनर्स चे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी १९६८ साली मुंबई येथे सी.ए.चे शिक्षण घेतले. घरचा उद्योग सांभाळण्याचा निर्णय अरुणभाई गुजराथी यांनी घेतला. यासाठी ते चोपड्यात परत आले.
अरुणभार्इंचा वसा आणि वारसा जपण्याचे काम चिरंजीव आशिष गुजराथी हे करित आहेत. आशिष यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण पुणे येथून पूर्ण केले. त्यांनी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. घरचा उद्योग महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये विखुरलेला होता. म्हणून त्याच उद्योगातही सक्रिय झाले जसे अरुणभाई मुंबई येथून घरी परत आले तसेच कौटुंबिक उद्योगात सहभागी होण्याचे आशिष यांनी ठरविले. उद्योगाची ओळख व्हावी म्हणून १९९६ मध्ये राजकोट जिल्ह्यातील जसदन या गावी जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगाची उभारणी केली. पुन्हा बडोदरा जिल्ह्यातील माकन या गावी दुसऱ्या फॅक्टरीची उभारणी सन १९९७ मध्ये केली. सन २००५ मध्ये शिरपूर येथे कापड मिलची स्थापना केली. शासकीय योजनांचा नीटनेटका अभ्यास करून उद्योग उभारण्यासाठी उपयोग करून घेणे हा आशिष गुजराथी यांच्यातील गुण आहे. चोपडा येथे २०१० साली खासगी बाजाराची स्थापना त्यांनी केली. सन २०१५ मध्ये शिरपूर येथे सूतगिरणी सुरू केली.यासोबतच त्यांनी रोटरी क्लबचे सहप्रांतपाल म्हणून काम पाहिले आहे. चोपडा शहरात साहित्य चळवळ कायम राहावी म्हणून नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. खान्देश जिनिंग अॅण्ड प्रेसिंग चे ते संस्थापक कार्याध्यक्ष आहेत . अरुणभाई गुजराथी यांच्या कार्यशैली प्रमाणेच आशिष यांच्या कामाची पद्धत आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अरुणभाई गुजराथी यांनी आपला ठसा उमटविला. त्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस पक्षात त्यांनी पक्ष वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली. आजही ते कामात झोकून देतात. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.