‘अश्मिरा’मुळे जीवनाचे झाले सुरेल गाणे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:31 PM2019-03-08T12:31:32+5:302019-03-08T12:31:37+5:30
नातेवाईकांचा विरोध असतानाही घेतली मुलगी दत्तक
चुडामण बोरसे ।
जळगाव : मूलबाळ होत नसल्याने वंशाचा दिवा म्हणून मुलगाचा दत्तक घेण्याचा नातेवाईकाचा आग्रह. यानंतरही या जोडप्याने मुलीला दत्तक घेऊन समाजात वेगळा पायंडा पाडला. तिच्याच सोनपावलांनी आमच्या जीवनाचे सुरेल गाणे झाल्याची भावना या दाम्पत्याची आहे.
मोहम्मद जावेद शेख हरुण बागवान व त्यांची पत्नी शकीराबी असे या दाम्पत्याचे नाव. गणेश कॉलनीतील चौकात गेल्या अनेक वर्षापासून जावेद यांची केळी विक्रीची ठेलगाडी आहे. बागवान गल्लीत ते राहतात. घरात दोन भाऊ, त्यांना मुले- बाळे आहेत. परंतु जावेद दाम्पत्याला लग्नानंतर बरीच वर्षे होऊन मुल- बाळ झाले नाही. अशावेळी अनेक ठिकाणाहून चौकशी केली जाते. मग शेख यांच्या आईने भावाचाच मुलगा दत्तक घ्यावा, म्हणून प्रस्ताव मांडला. पण जावेद हे आपल्या प्रस्तावावर ठाम राहिले. दत्तक घेईल तर मुलगीच. यावर एक नाही तर तब्बल दोन वर्षे घरात चर्चा होत होत्या. जावेद हे मुलगीच दत्तक घ्यायची म्हणत असल्याने आई आणि पत्नीलाही मग घरात मुलगी असावी, असे वाटू लागले... एक दिवस मग आईनेच आपल्या वंशाचा दिवा नसला तरी चालेल पण वंशाला पणती नक्कीच हवी... म्हणून जावेद यांना सांगून टाकले.
आता मुलगी दत्तक कोणाची आणि कोठून घ्यावी... असा प्रश्न जावेद यांच्या कुटुंबात उभा राहिला. नातेवाईकांनी भावाची मुलगी दत्तक घेण्याचा आग्रह केला. शेख यांनी थेट दोंडाईचा येथील आपल्या साडूची मुलगी दत्तक घेतली आणि त्यावेळी ती अवघ्या ४० दिवसांची होती. तिचे मग ‘अश्मिरा’ असे नामकरण करण्यात आले. आता ती तीन वर्षाची झाली आहे.मुले भरपूर भेटतील पण मुलगी ही लक्ष्मीचे रुप आहे, असे आपण मानतो. कारण अश्मिरा आमच्या घरात आपल्यापासून तिच्या सोनपावलांनी आम्हाला बरेच काही दिले आहे. तिच्यामुळेच आमचे जीवनही उजळून निघाल्याची शेख दाम्पत्याची भावना आहे.