भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी अशोक कांडेलकर, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:45 AM2019-11-15T11:45:37+5:302019-11-15T11:46:12+5:30

खडसे-महाजन गटाचा समन्वय साधणार

Ashok Kandelkar, Haribhau Javale, Smita Wagh discuss the name of BJP Jalgaon district president | भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी अशोक कांडेलकर, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ यांच्या नावाची चर्चा

भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी अशोक कांडेलकर, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ यांच्या नावाची चर्चा

googlenewsNext

जळगाव : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस राहणार असून यासाठी पक्षाकडून एकनाथराव खडसे तसेच गिरीश महाजन गटाचा समन्वय साधण्यावर भर राहणार आहे. असे असले तरी सध्या जी नावे अधिक चर्चेत आहेत, त्यामध्ये खडसे गटाच्या तिघांची नावे आघाडीवर आहेत. यात जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी आमदार हरिभाऊ जावळे तसेच आमदार स्मिता वाघ यांचा समावेश आहे.
दरम्यान, या तिघांच्या नावासोबतच जि.प.चे शिक्षण सभापती पोपट भोळे, जि.प. चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प.चे माजी सभापती पी.सी. पाटील, जि.प. चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. नवीन जिल्हाध्यक्षांची डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निवड होण्याची शक्यता असून तत्पूर्वी स्थानिक समित्यांचे गठन करण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भाजपची संघटनात्मक बैठक होणार आहे. यासाठी जिल्हाध्यक्षांना बोलविण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला असून सध्यादेखील दोन्ही खासदार, चार आमदार भाजपचे आहेत. तसेच जि.प., जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून या मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद प्रभारी आहे. त्यामुळे आता राज्यातील जिल्हाध्यक्षांसह जळगाव जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया सुरू होऊ घातली आहे.
अद्याप जिल्हाध्यक्षपदाबाबत हालचाली नसल्याचे सांगितले जात असले तरी यासाठी संघटनात्मक काम करणाऱ्या चेहºयाला पसंती असण्यासह सामाजिक समीकरणे जुळविणे, भौगोलिक संतुलन राखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खडसे-महाजन गटाचा समन्वय याविषयी चाचपणी सुरू झाली आहे.
संघटनेचा प्रमुख निवडताना ‘क्लास व मास लिडर’ या दोन्ही मुद्यांचा विचार केला जातो. यात जिल्हाध्यक्षपदासाठी ‘मास लिडर’ चेहरा पाहिला जाणार आहे. त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.
या सर्व मुद्यांचा विचार केला तर जिल्ह्यातील वेगवेगळ््या भागातील व्यक्तींचे नावे चर्चिले जात आहे. यामध्ये मात्र गिरीश महाजन गटाचे वर्चस्व काहीसे कमी होते की काय असेही चित्र आहे. कारण जी नावे चर्चेत आहेत, त्यामध्ये खडसे गटाचे अधिक नावे आहेत. त्यानुसार पाच वर्षे जि.प. अध्यक्ष राहण्यासह जिल्हाध्यक्षपदाचा अनुभव, प्रशासकीय जाण असलेले आणि संघ परिवाराचा पगडा असलेले अशोक कांडेलकर, माजी आमदार हरिभाऊ जावळे आणि महिला अध्यक्षा म्हणून आमदार स्मिता वाघ यांचे नाव पुढे राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Ashok Kandelkar, Haribhau Javale, Smita Wagh discuss the name of BJP Jalgaon district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव