Ishwarlal Jain : अशोका बिल्डर्सची ‘गंडा’ एक्स्प्रेस ठाणे-पुणे व्हाया नाशिक!, अनेक कारनामे उघड करू : माजी खासदार ईश्वरलाल जैन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:10 AM2021-10-30T07:10:22+5:302021-10-30T07:10:57+5:30

Ishwarlal Jain : ईश्वरलाल जैन यांच्याकडून कर्जाऊ घेतलेली ३० कोटी रुपयांची रक्कम परत न करता, त्याऐवजी संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित करण्यासाठी काही भूखंड देऊन, पुढे ती रक्कम जप्त का करू नये, अशी नोटीस अशोका बिल्डर्सने जैन यांना धाडली.

Ashoka Builders on fraud cases in Thane, Pune and Nashik! Let's reveal many deeds: Former MP Ishwarlal Jain | Ishwarlal Jain : अशोका बिल्डर्सची ‘गंडा’ एक्स्प्रेस ठाणे-पुणे व्हाया नाशिक!, अनेक कारनामे उघड करू : माजी खासदार ईश्वरलाल जैन

Ishwarlal Jain : अशोका बिल्डर्सची ‘गंडा’ एक्स्प्रेस ठाणे-पुणे व्हाया नाशिक!, अनेक कारनामे उघड करू : माजी खासदार ईश्वरलाल जैन

googlenewsNext

- कुंदन पाटील

जळगाव : अशोका बिल्डर्सने केवळ आपलीच नव्हे तर आणखीही अनेक जणांची फसवणूक केली असून, त्यांचे सर्व गैरव्यवहार आपण न्यायालयात उघड करू, असे प्रतिपादन माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.
ईश्वरलाल जैन यांच्याकडून कर्जाऊ घेतलेली ३० कोटी रुपयांची रक्कम परत न करता, त्याऐवजी संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित करण्यासाठी काही भूखंड देऊन, पुढे ती रक्कम जप्त का करू नये, अशी नोटीस अशोका बिल्डर्सने जैन यांना धाडली. त्यासंदर्भात जैन यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी गुरुवारी अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख ऊर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा. नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणासंदर्भात जैन यांनी सांगितले की, शुक्रवारी दिवसभरात पन्नासपेक्षा जास्त लोकांनी आपल्याशी संपर्क करून अशोका बिल्डर्सने त्यांचीही फसवणूक केल्याचे सांगितले. ते लोक लवकरच कागदपत्रांसह भेटीसाठी  येणार असून, अशोका बिल्डर्सचा हा गोरखधंदा आपण न्यायालयात उघड करणार आहोत, असेही जैन म्हणाले.
अशोका बिल्डर्सने ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात एकदा ११ कोटी रुपये व एकदा १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हातउसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम जैन यांना दोन भागांत परत करण्यात आली. उर्वरित २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयांची रक्कम परत मागितली असता, रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली, अशी जैन यांची फिर्याद आहे.
कर्जाऊ घेतलेल्या रकमेचा परतावा अशक्य झाल्याने अशोका बिल्डर्सने ईश्वरलाल जैन यांच्याशी संयुक्त उपक्रमांतर्गत नाशिक व ठाणे जिल्ह्यातील काही भूखंडांवर प्रकल्प विकसित करण्याचा करार केला; मात्र पुढे जैन यांनी ते भूखंड विकसित केले नाहीत, असा सोयीचा धागा पकडत, अशोका बिल्डर्सने तुमच्याकडून घेतलेली रकम जप्त का करू नये, अशी नोटीस जैन यांनाच धाडली. त्यानंतर जैन यांनी भूखंडांची शोधाशोध केली तेव्हा ‘अशोका’ बिल्डर्सने दिलेले सर्वच भूखंड वादग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.
जळगावच्या शनिपेठ पोलिसात दाखल गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलीस उपाधीक्षक भास्कर डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

भूखंडांवर वादाचे दगड
अशोक बिल्डर्सने ईश्वरलाल जैन यांच्या सुपुर्द केलेल्या भूखंडांपैकी सातपूर (नाशिक) येथील भूखंड कालवा तसेच रस्ता योजनेसाठी राखीव आहे. सिन्नरच्या भूखंडावर रस्ता विकसित झाला आहे, तसेच तसेच त्या भूखंडाचा मालकी हक्कही संदिग्ध आहे. आडगाव (नाशिक) येथील भूखंडाचा वाद न्यायप्रविष्ट आहे, तर विहिगाव (ठाणे) येथील भूखंडांवर ईनामी, ग्रीन झोन, तसेच वन व कृषी विभागाचे आरक्षण आहे. आणखी एका भूखंडाच्या मालकी हक्काबाबतही स्पष्टता दिसली नाही.

पुण्यातही बिल्डरची साडेनऊ कोटींची फसवणूक
पुणे : पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाची ९ कोटी ३३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अशोका इंजिनिअरिंगचे चेअरमन अशोक कटारिया व त्यांचे पुत्र आशिष यांच्यासह पंकज भागचंद छल्लानी, भागचंद छल्लानी, अमोल सुधाकर साठे यांच्याविरुद्ध पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक रोहन किशोर पाटे यांनी 
फिर्याद दिली आहे. पंकज छल्लानी यांनी इतर आरोपींशी संगनमत करुन बनावट कागदपत्रे तयार केली. बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी करुन त्याआधारे बेकायदेशीर खरेदीखते तयार करीत फसवणूक केल्याचे पाटे यांनी फिर्यादीत म्हटले होते. 

Web Title: Ashoka Builders on fraud cases in Thane, Pune and Nashik! Let's reveal many deeds: Former MP Ishwarlal Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.