लिफ्ट मागितली अन‌् एकाच मिनिटात अपघातात जीव गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:58+5:302021-03-10T04:16:58+5:30

जळगाव : रेमंड कंपनीत जाण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या कंपनीच्याच सहकाऱ्याकडे लिफ्ट मागितली अन‌् अवघ्या एक मिनिटातच मागून भरधाव वेगाने आलेल्या ...

Asked for a lift and died in an accident in a minute! | लिफ्ट मागितली अन‌् एकाच मिनिटात अपघातात जीव गेला!

लिफ्ट मागितली अन‌् एकाच मिनिटात अपघातात जीव गेला!

Next

जळगाव : रेमंड कंपनीत जाण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या कंपनीच्याच सहकाऱ्याकडे लिफ्ट मागितली अन‌् अवघ्या एक मिनिटातच मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली व त्यात दुचाकी पुढे चालणाऱ्या एसटी बसमध्ये घुसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (५७, रा. सिंधी कॉलनी) हे जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार अक्षय विजय पाटील (३०, रा. शिवमनगर, निमखेडी परिसर) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता इच्छादेवी चौकानजीकच्या सिध्दिविनायक हॉस्पिटलमसमोर झाला. डंपरसह चालक धीरज मोहन धनगर (१८, रा. कडगाव, ता. जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ मोरे हे रेमंड कंपनीत कामाला होते. रोज सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी ते घरून इच्छादेवी चौकापर्यंत चालत यायचे. तेथून कंपनीत जाणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून ड्युटीवर जायचे. त्याप्रमाणेच मंगळवारी ते चालत इच्छादेवी चौकात आले. त्याच वेळी ड्युटीवर जाणाऱ्या अक्षय विजय पाटील या सहकाऱ्याकडे त्यांनी लिफ्ट मागितली. दुचाकीवरून(क्र.एम.एच.१९ सी.एल.६७७७) पुढे जायला निघताच अवघ्या एका मिनिटात मागून आलेल्या वाळूच्या डंपरने (क्र.एम.एच.०४ जी.ए.३४९२) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ही दुचाकी पुढे चालणाऱ्या जळगाव-जामनेर बसमध्ये घुसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मागे बसलेले मोरे जागीच गतप्राण झाले तर दुचाकीस्वार अक्षय याची मांडी फाटली असून छाती व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. मोरे यांना जिल्हा रुग्णालयात तर अक्षय याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाळूची वाहने उठली जीवावर

या घटनेची माहिती मिळताच इच्छादेवी चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाळूचा डंपर व चालक धीरज धनगर याला ताब्यात घेतले. या मार्गावरून सकाळी मोठ्या प्रमाणात वाळूचे डंपर वापरतात. कारवाई चुकविण्यासाठी वेगाने वाहने चालवून ते महामार्ग व मुख्य रस्त्याचे अंतर कापण्याचे प्रयत्न करतात, त्यातच हे असे अपघात होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. हा डंपर निमखेडी येथून वाळू घेऊन जामनेर येथे जात असल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील व रतिलाल पवार यांनी पंचनामा केला. दरम्यान, मोरे यांच्या पश्चात पत्नी वंदना, मुलगा अक्षय व अश्विन असा परिवार आहे. दोन्ही मुले उच्चशिक्षित असून अविवाहित आहेत.

नियमांचे उल्लंघन करून डंपरचे स्टेअरिंग दिले तरुणाच्या हाती

ट्रक, डंपर यासह अवजड वाहन चालवायचे असेल तर त्यासाठी चालकाचे वय २० वर्ष पूर्ण असले पाहिजे, त्याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकत नाही. या घटनेत १८ वर्षांच्या धीरज धनगर या तरुणाच्या हाती डंपरचे स्टेअरिंग देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करुन डंपरचा ताबा दिला म्हणून डंपर मालकावरच गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ला दिली.

--

Web Title: Asked for a lift and died in an accident in a minute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.